सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्ती; खोदकामासाठी दीडशे कोटींचा चुराडा

सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेले रस्ते खराब झाल्याचे सांगत शहरातील रस्ते आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पथ विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. दुरुस्तीबरोबरच विविध कारणांसाठी शहरातील दोनशे रस्त्यांची खोदकाम होणार असून त्यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कामांमुळे पुढील काही महिने अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम होणार असून जागोजागी खोदलेले रस्ते असेच चित्र पुढील दोन-तीन महिने राहणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी शहरात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे करण्यात आली होती. सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते करण्याबरोबरच काही रस्त्यांचे डांबरीकरणही करण्यात आले होते. त्यातच नागरिकांना विविध सेवा पुरविण्याच्या दृष्टीने खासगी मोबाईल कंपन्या आणि काही शासकीय कंपन्यांकडून भूमिगत वाहिन्या टाकण्यात येत होत्या. त्यामुळे रस्ते उखडले. रस्ते उखडल्यामुळे प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे यापुढे नव्याने रस्ते खोदकामाला मान्यता दिली  जाणार नाही, परवानी दिलीच तर रस्ते खोदाई धोरणानुसार परवानगी दिली जाईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले होते. मात्र हा दावा सहा महिन्यांतच फोल ठरला आहे. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यांची पुन्हा खोदाई सुरू झाली असून त्यासाठी दीडशे कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन पथ विभागाकडून करण्यात आले आहे.

पथ विभागाकडून नवे रस्ते तसेच पदपथांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात नव्याने करण्यात आलेल्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामेही प्रस्तावित आहेत. सुमारे दोनशे रस्त्यांची कामे करण्यात येणार असून सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण अशी कामे नियोजित आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग, पेठांचा भाग आणि काही प्रमाणात उपनगरांमध्ये ही कामे होणार आहेत. यातील काही कामे सुरूही झाली आहेत. एकाच वेळी बहुतांश रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्यामुळे आणि त्यातून रस्ते खोदाई झाली असून मध्यवर्ती भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, आवश्यक तेवढय़ाच रस्त्यांची कामे करण्यात येत असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. नव्या रस्त्यांबरोबरच अन्य रस्त्यांची दुरुस्ती आणि फक्त अन्य अनुषंगिक कामे होणार असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली.

निधीसाठी सारेकाही..

महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांकडूनही उपरस्त्यांची दुरुस्ती तसेच छोटय़ा रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदी कामे सर्वत्र सुरू आहेत. त्यासाठी वर्गीकरणाच्या माध्यमातून निधी मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे सुरू होणार असून परिणामी रस्ते खोदाईमध्ये भरच पडणार आहे. शहरातील एकूण रस्त्यांची लांबी २ हजार २०० किलोमीटर आहे.

Story img Loader