शहरातील अनेक गल्ली-बोळांमध्ये आणि छोटय़ा रस्त्यांवर महापालिकेतर्फे अतिशय वेगाने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे रस्ते आले वर अणि घरे गेली खाली असा प्रकार झाला आहे. नागरिक विरोध करत असतानाही रेटून नेलेल्या या कामामुळे येत्या पावसाळ्यात सोसायटय़ांच्या आवारात, तसेच घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होणार असून पालिकेच्या पथ विभागाने केलेले हे काम नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे उघड झाले आहे.
पुणे शहरासमोर असलेले अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून अतिशय वेगाने व चपळता दाखवून सध्या एकच काम केले जात आहे ते म्हणजे रस्त्यांचे काँक्रिटीकरण. या कामांचा वेग पाहता या कामांमध्ये राजकीय वर्तुळाला आणि प्रशासनालाही मोठाच रस असल्याचे दिसत आहे. गल्लीबोळ काँक्रिटीकरणांच्या या कामात नियमांचाही भंग करून कामे रेटून नेली जात आहेत. सर्व प्रकारच्या इमारतींचे जोते, बाजूच्या जमिनीचे पातळीपासून किमान ४५ सेंटिमीटर उंचावर हवे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांचे घरबांधणी योडनेमधील इमारतींचे जोते ३० सेंटिमीटर उंचीवर हवे, असा नियम आहे. या नियमांचे पालन कोणत्याही बांधकामात सर्वसामान्य नागरिकाला करावे लागते. विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसा नकाशा सादर केला, तरच बांधकामाला परवानगी मिळते. महापालिकेच्या पथ विभागाने मात्र या नियमाचे सरसकट उल्लंघन केल्याचे जागोजागी दिसत आहे.
मुळातच, रस्त्यांचे डांबरीकरण करताना मूळ रस्ता न खरवडता वा डांबराचा थर न काढता थर टाकले जातात. त्यामुळे रस्त्यांची उंची अगोदरच वाढली आहे. पूर्वी रस्ते खोदून डांबरीकरण केले जात असे. मात्र नव्या गैरपद्धतीमुळे काही वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचे जोते हे आता रस्त्यांपेक्षा खाली गेले आहेत. त्यातच नव्या काँक्रिटीकरणाची भर पडली असून या पद्धतीमुळे बहुतेक इमारती खाली आणि तेथील सिमेंटचे रस्ते वरती असा प्रकार झाला आहे. असे रस्ते करताना पावसाळी गटारेही केली जात नाहीत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमध्ये किंवा सोसायटय़ांच्या, बंगल्यांच्या आवारांमध्ये शिरण्याची भीती आहे. तसेच रस्त्यांचेही नुकसान होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा