पुणे : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. अनेक रस्त्यांवर नव्याने खड्डे पडले असून, यापूर्वी दुरुस्ती केलेले रस्तेही उखडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीसाठी केलेला अडीच कोटींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्तीचे दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याप्रकरणी महापालिकेच्या पथ विभागाने सात अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली.
महापालिकेने ठेकेदारांमार्फत केलेल्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले होते. रस्त्याचे काम केल्यानंतर तीन वर्षे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असतानाही रस्त्यांवर खड्डे पडले होते. महापालिकेच्या मुख्य पथ विभागाकडे १३९ रस्ते देखभाल दुरुस्ती दायित्व असलेले आहेत. या रस्त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार प्रती खड्डा पाच हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. तर क्षेत्रीय कार्यालयाकंडूनही देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांची यादी पथ विभागाला देण्यात आली होती.
दुरुस्तीची कामे तकलादू
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल पावसाने केली आहे. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर योग्य ती कारवाई न केल्याप्रकरणी सात अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्याकडून अद्यापही लेखी खुलासा प्राप्त झालेला नाही.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून बारा मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जातात. तर बारा मीटर रुंदीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते मुख्य पथ विभागाकडून केले जातात. शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीचा कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.