पुणे : शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणासाठी १९३ कोटी रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रमुख ५० रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. सततच्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते दुरुस्तीची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यातील रस्ते दुरुस्तीसाठी २१२ कोटींच्या खर्चालाही पूर्वगणन समितीने मान्यता दिली आहे. त्या अंतर्गत १९३ कोटींची अल्पमुदतीची निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली आहे. या रस्त्यांची भविष्यात खोदाई करण्यात येणार नाहीत, असा दावा प्रशानसाकडून करण्यात आला आहे.
शहरातील प्रमुख ५० रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून काही रस्त्यांवर सिमेंटचे थर दिले जाणार आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या अनुषंगाने रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली.
एकूण १४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार असून स्थायी समितीच्या मान्येतनंतर तातडीने डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात तीनशे कोटींची कामे करण्याचे प्रस्तावित आहे, असे पथ विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.