जुन्नर परिसरातील बेल्हे गावात माजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले. चोरट्यांकडून दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. दरोडेखाेरांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार एसटी महामंडळाच्या शिवनेरी गाडीवर कंत्राटी चालक असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नाशिक, मध्यप्रदेशात कारवाई करुन दरोडेखोरांना अटक केली.

हेही वाचा- आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वत: कधी…”

या प्रकरणी शिवनेरी बसचालक नईम चांद शेख (वय ५२), त्याचा मुलगा इर्शाद नईम शेख (वय २८, रा. नाशिक जेल रस्ता, मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान (वय ६२, रा. खाजराणा, इंदूर, मध्यप्रदेश), शुभम रामेश्वर मालवीय (वय २४, रा. गादेशहा पिपलिया, देवास, मध्यप्रदेश), रहमान फजल शेख (वय ३४, रा. नाशिक जेल रस्ता), लखन बाबुलाल कुंडलिया (वय ३०, रा. रसलपूर, देवास, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सदाशिव बाेरचटे यांनी आळे फाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १९ डिसेंबर रोजी बाेरचटे यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरटे शिरले. बोरचटे कुटुंबीयांना पिस्तुल तसेच कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा २८ लाख रुपयांचा ऐवज लुटला होता.

Story img Loader