पिंपरी- चिंचवडमधील रहाटणी येथे पुणेकर ज्वेलर्स या सोने-चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या दुकानावर भर दिवसा दरोडा टाकल्याची घटना बुधवारी घडली. दोन दुचाकींवरुन आलेल्या पाच दरोडेखोरांनी दुकानातील अडीच किलोंचे सोन्याचे दागिने चोरले असून दरोडेखोरांच्या गोळीबारात दुकानाचे मालक दिव्यांग मेहता हे जखमी झाले आहेत.

दिव्यांग मेहता यांचे रहाटणी परिसरात पुणेकर ज्वेलर्स हे दुकान असून बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पाच पैकी तीन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानाचे शटर बंद केले. यानंतर त्यांनी दिव्यांग मेहता यांना बॅगेत सोन्याचे दागिने भरण्यास सांगितले. मात्र, दुकान मालक दिव्यांग यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळी झाडली. या झटापटीत मेहता यांच्या पायाला गोळी लागली. आरडा ओरडा झाल्यानंतर दरोडेखोरांनी दुचाकीवर धूम ठोकली. दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची टेपही चोरांनी पळवल्याने वाकड पोलिसांसमोर चोरांना शोधण्याचे आव्हान आहे.

दोन साथीदार बाजूच्या दुकानात
पुणेकर ज्वेलर्समध्ये तीन जण गेल्यानंतर त्यांचे दोन साथीदार शेजारी असलेल्या दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला गुंतवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे वेगवेगळ्या वस्तू मागितल्या. परंतु, गोळीबाराचा आवाज येताच त्या दोघांनीही धुम ठोकली.

Story img Loader