पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सहा जणांच्या टोळक्याने डॉक्टरच्या घरी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. यावेळी त्यांना शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरोडेखोरांनी यावेळी ५० लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांचे सोन्याचे दागिने असा एकूण ६६ लाखांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या घरात हा दरोडा टाकण्यात आला असून ते बालरोग तज्ञ आहेत. मध्यरात्री टाकलेल्या या दरोड्याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय डॉ. हिरालाल हे बालरोग तज्ञ असून लोणावळ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. ते आणि त्यांची पत्नी हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर राहतात. रुग्णालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. दरम्यान, मध्यरात्री अचानक सहाजणांचे टोळके थेट डॉक्टरांच्या बेडरूमध्ये आले. चाकूचा धाक दाखवून ओरडलात तर जीवे मारू अशी धमकी दिली. हरीलाल आणि त्यांची पत्नी विजया दोघे घाबरले होते. दरोडेखोरांनी दोघांचे हात आणि पाय दोरीने बांधून कपाटाच्या चाव्या आणि पैशांची मागणी केली. भेदरलेल्या विजया यांनी ड्रायव्हरमध्ये चाव्या असल्याचं सांगितलं. यानंतर दरोडेखोरांनी कपाटातून तब्बल ६६ लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी बाहेर काढला ज्यामध्ये ५० लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांच्या दागिन्यांचा समावेश होता.
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास एक महिन्यांतर पुन्हा येऊ आणि जीवे मारू अशी धमकी दरोडेखोरांनी दिली आणि पसार झाले. दरम्यान, दरोडेखोर गेल्याची खात्री होताच दोरीने बांधलेले हात, पाय डॉक्टरांनी सोडून अलार्म वाजवला. त्यानंतर रात्रपाळीला असलेले कामगार धावतपळत वर आले. त्यांच्यातील एकाने लोणावळा पोलिसांना तातडीने बोलावले. सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कावत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे. अज्ञात दरोडेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
हिरालाल यांचा मोठा मुलगा गौरव हा गुजरातमध्ये मणक्याचा सर्जन असून दुसरा मुलगा वैभव हा इंजिनिअर आहे. तो गेल्या १७ वर्षांपासून अमेरिकेत आहे.