लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात लुटमारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावर रिक्षाचालक आणि साथीदाराने पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी चोरून नेली, तसेच बिबवेवाडी भागात एका तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी तरुणाला दगडाने मारहाण केल्याने तो जखमी झाले.
याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. तो आणि त्याचा मित्र श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पहाटे साडेतीनच्या सुमारास काकड आरतीसाठी आला होता. मंडईतील रामेश्वर चौकात रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी पसार झालेल्या रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.
आणखी वाचा-पुणे : सिंहगड रस्ता भागात बंगल्यातून साडेबारा लाखांचा ऐवज चोरीला
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात एका तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील दहा हजारांचा मोबाइल संच चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण बांधकाम मजूर आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारात तो अप्पर इंदिरानगर परिसरातील पीएमपी बस डेपो परिसरातून निघाला होता. त्यावेळी तीन ते चार तरुणांनी त्याच्याकडे पाहिले. त्यानंतर त्यांनी तरुणाला धमकावून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच चोरुन नेला. त्याला दगडाने मारहाण केली. मारहाणीत तरुण जखमी झाला.
पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाइल संच, सोनसाखळी, रोकड चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात लुटमारीच्या १८० हून जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.