रॉबिनहूड आर्मीचं बरंचसं काम हे व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरून चालतं. शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रॉबिनहूड आर्मीचं काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे व्हॉट्स अॅप ग्रुप करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनं सगळ्यांनाच एकमेकांशी जोडलं राहणं सोपं जातं.
सधन कुटुंबातील माणसे सहसा दिवसातून तीन वेळा पोटभर जेवू-खाऊ शकतात, मात्र आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत, ज्यांना प्रसंगी तीन दिवस सुद्धा खायला-प्यायला मिळत नाही, त्यांना खायला घालणं आणि दोन घास पोटात गेल्यानंतर त्यांचा समाधानाने उजळलेला चेहरा पाहणं हा खरोखरच शब्दात वर्णन न करता येणारा अनुभव असतो. रॉबिनहूड आर्मी या समाजमाध्यमातून जन्माला आलेल्या ग्रुपचे स्वयंसेवक उपाशीपोटी झोपणाऱ्यांना जेवू घालण्याचे आपले अनुभव सांगतात, तेव्हा आपल्या समाजातलं उपासमार आणि भूकबळींचं वास्तव गडदपणे जाणवायला सुरुवात होते.
जगातल्या ११ देशांमधल्या ६० शहरांमध्ये रॉबिनहूड आर्मी काम करते. दिल्लीतल्या नील घोष आणि आनंद सिन्हा या तरुणांनी २०१४ च्या ऑगस्टमध्ये रॉबिनहूड आर्मीला भारतात आणलं. मार्च २०१५ मध्ये पुण्यात रॉबिनहूड आर्मीनं आपलं काम सुरू केलं, तेव्हा सुरू झालेलं काम आता नुसतं काम राहिलं नसून त्याची चळवळ झाली आहे.
रॉबिनहूड आर्मीचं मुख्य काम शिजवलेलं पण न संपलेलं चांगल्या प्रतीचं जेवण उपाशी लोकांपर्यंत पोहोचवणं. पुण्यातील अनेक रेस्टॉरंट्स, मंगल कार्यालयं आणि लॉन्सवर आलेल्या आपल्या पाहुण्यांना वाढण्यासाठी पारंपरिक ते पंचतारांकित अशा वर्गवारीमध्ये मोडणारे असंख्य पदार्थ रांधले जातात. प्रत्यक्षात यातलं सुमारे एक तृतीयांश जेवण वाया जातं हे धक्कादायक असलं तरी वास्तव आहे. वाया जातं असं म्हणायचं कारण ते चांगलं असलं तरी ते कुणाच्या मुखी लागत नाही. इथेच रॉबिनहूड आर्मीचं योगदान सुरू होतं. रेस्टॉरंट, मंगल कार्यालयं किंवा लॉन्सच्या भटारखान्यात तयार झालेलं किंवा घरी एखाद्या कार्यक्रमासाठी मोठय़ा प्रमाणात शिजवलेलं जेवण उरलं, तर संबंधित व्यवस्थापक किंवा कुटुंबाकडून रॉबिनहूड आर्मीला एक फोन जातो. सहसा असा फोन रात्री दहानंतर येतो. सर्वसाधारणपणे रात्री ११ वाजेपर्यंत आलेले फोन रॉबिनहूड आर्मी स्वीकारते आणि त्यानंतर सुरू होतो त्या जेवणाचा प्रवास. रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक संबंधित ठिकाणी जाऊन तिथलं जेवण तपासतात. म्हणजेच त्याची चव बघतात. चांगलं जेवण लगेच ताब्यात घेऊन त्या त्या परिसरातल्या गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं. शहराच्या १३ भागांमध्ये हे काम चालतं. पुण्यात हे काम सुरू झालं तेव्हा दररोज सुमारे १५० लोकांना जेवायला घालण्याचं काम केलं जात होतं. आज ही संख्या दिवसाला सुमारे ५०० लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. २२ ते २८ या वयोगटातले ५०० पेक्षा जास्त तरुण-तरुणी या कामात स्वयंसेवक म्हणून सहभागी होतात. रॉबिनहूड आर्मीचं बरंचसं काम हे व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरून चालतं. शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रॉबिनहूड आर्मीचं काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे व्हॉट्स अॅप ग्रुप करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनं सगळ्यांनाच एकमेकांशी जोडलं राहणं सोपं जातं. ज्या नवीन स्वयंसेवकांना या आर्मीत सहभागी व्हायचं आहे, त्यांना रॉबिनहूड आर्मीच्या संकेतस्थळावर स्वतचं नाव-पत्ता नोंदवून या कामाशी जोडलं जाता येतं. पुण्यातल्या रॉबिनहूड आर्मीच्या कामाला नुकतीच ३ वर्ष पूर्ण झाली आणि विशेष म्हणजे या ३ वर्षांत सुमारे ५ लाख १८ हजार लोकांना जेवायला घालण्याचं काम या आर्मीनं केलंय. स्थापनेनंतर लगेच रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक झालेले सत्येंद्र राठी सांगतात, आमच्या अटी दोनच. एक म्हणजे आम्ही पैसे स्वरूपात कोणत्याही देणग्या स्वीकारत नाही आणि दुसरं, या जेवणाच्या दर्जाच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करत नाही. आमच्याकडे जेवण ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही, आम्हाला ती नको सुद्धा, कारण जेवण ते ताजं असतानाच गरजूंना मिळावं हा आमचा कटाक्ष आहे.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हाताशी आहे. बाहेर जेवायला गेलो, तर मागवलेल्या ‘डिश’चा फोटो किंवा सणासुदीला, कार्यप्रसंगाला घरी केलेल्या सुग्रास स्वयंपाकाचा फोटो अनेकदा आपण स्टेटस म्हणूनही ठेवतो. पण त्यातलं काही संपणार नसेल, तर
ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी रॉबिनहूड आर्मी एका क्लिकवर उपलब्ध आहे, हे लक्षात असू द्या!
संपर्क – ९४२२९ ८७५०८/ ९८२३० ७८६३५
भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com