एशिया ब्रॉडकास्टिंग युनियनच्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉनचे यजमानपद या वर्षी भारताला मिळाले असून रविवारी (२४ ऑगस्ट) बालेवाडी येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या वर्षी या स्पर्धेत १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
एशिया ब्रॉडकास्टिंग युनियनतर्फे आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा घेण्यात येते. या वर्षी या स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले असून सहा वर्षांनंतर भारताला यजमानपद मिळाले आहे. दूरदर्शन व एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातर्फे भारतातील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षी ‘पालकत्वाला सलाम’ या संकल्पनेवर ही स्पर्धा होणार आहे. जगातील १६ देशांमधील १८ अभियांत्रिकी महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. इराण, मलेशिया, बांग्लादेश, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, रशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ या देशांचा या स्पर्धेत सहभाग आहे. भारताकडे यजमानपद असल्यामुळे भारतातील दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. भारताचे प्रतिनिधित्व अहमदाबाद येथील निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालय करणार आहे.
बालेवाडी येथील क्रीडानगरी येथे ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे. पौड रस्त्यावरील एम.आय.टी. महाविद्यालयाच्या आवारात या प्रवेशिका मोफत उपलब्ध आहेत. स्पर्धेबाबतची अधिक माहिती http://www.roboconindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.