पुणे : मूत्रपिंडाचा गंभीर विकार असलेल्या एक महिन्याच्या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारंपरिक शस्त्रक्रियेत जोखीम असल्याने डॉक्टरांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या बाळावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. एवढ्या लहान बाळावर अशा प्रकारे पहिल्यांदाच रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.
युटेरोपेल्विक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन या विकाराने हे बाळ त्रस्त होते. या विकारात मूत्रवाहिनी ही मूत्रपिंडाशी जोडणाऱ्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. आईच्या पोटात असतानाच हा विकार सुरू होतो. त्यामुळे जन्मानंतर त्यावर उपचार करणे आवश्यक असते. या बाळाला रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. हे बाळ केवळ एक महिन्याचे असल्याने त्याच्यावर पारपंरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. या मूत्रविकारामुळे बाळाच्या मूत्रपिंडाला सूज येऊ मूत्रपिंडाला धोका निर्माण होण्याचा शक्यता होती.
नवजात शिशूमध्ये ही एक दुर्मीळ व गुंतागुंतीची स्थिती आहे. त्यामुळे एवढ्या लहान वयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक असते. पारंपरिकपणे बाळांमध्ये सुधारात्मक शस्त्रक्रिया खुल्या प्रक्रियेद्वारे केली जाते. त्यात गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो आणि बरे होण्यास कालावधीही जास्त लागतो. त्यामुळे बालमूत्ररोग तज्ज्ञ डॉ. हिमेश गांधी यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय पथकाने कमीत कमी छेद असलेला रोबोटिक पद्धतीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली. कमीत कमी दुखापत आणि टाक्यांसह ही शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे शस्त्रक्रियेपश्चात गुंतागुंतीची जोखीम कमी करत बाळ लवकर बरे झाले.
रुग्णालयाचा दावा काय…
मूत्रपिंडाचा हा गंभीर विकार असलेल्या एक महिन्याच्या नवजात बालकावर जगातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा रूबी हॉल क्लिनिकने केला आहे. दा विन्सी रोबोटिक सर्जिकल प्रणालीचा वापर करून डॉक्टरांच्या पथकाने १ मार्चला ही शस्त्रक्रिया केली. या बाळाला २८ फेब्रुवारीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत ३ मार्चला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
एवढ्या लहान बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया करणे हे बालरोग मूत्रविज्ञानातील महत्त्वाचे पाऊल आहे. कमीत कमी दुखापत आणि टाक्यांसह ही शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे शस्त्रक्रियेनंतर बाळाला दोनच दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. – डॉ. हिमेश गांधी, बालमूत्ररोग तज्ज्ञ