Rohingya in Pune: चालू वर्षातील जुलै महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारच्या दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी, अशा चार रोहिंग्यांवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुजम्मिल मोहम्मद अमीन खान (४३) या रोहिंग्या आरोपीने पुण्यात देहूरोड येथे त्याचे घर बांधले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच त्याने कोणतेही कागदपत्र स्वतः सादर न करता केवळ ५०० रुपयात आधार कार्ड मिळवून पुढे भारतीय नागरिक म्हणून वावरताना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पासपोर्टही मिळविले.
पोलिसांच्या माहितीनुसार खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत “मौलाना कोर्स” पूर्ण केला आहे. तो त्याची पत्नी आणि दोन मुलींसह म्यानमार येथे राहत होता. मात्र त्याने डिसेंबर २०१२ च्या सुमारास कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केले. बांगलादेशातील ‘रेफ्युजी कॅम्प’ मध्ये राहताना त्याने काही काम मिळावे म्हणून प्रयत्न केला, पण काही हाती लागले नाही. भारतात पश्चिम बंगालमध्ये काम मिळू शकेल, असे त्याला समजले.
हे वाचा >> पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, भांडणांमुळे खानने पत्नीला सोडून शफीका या रोहिंग्या महिलेशी दुसरे लग्न केले, जी तेव्हा आधीच एका मुलाची आई होती. खानने २०१३ च्या मध्यात बेकायदेशीर मार्गाने पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आपली दुसरी पत्नी आणि मुलासह भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे. तो कोलकात्याला गेला, पण तिथेही मनासारखे काम मिळू शकले नाही.
त्यानंतर तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. कंपनीने दिलेल्या खोलीत कुटुंबासह राहू लागला. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अद्याप शोध लागलेला नसून म्यानमार आणि बांगलादेशमधून लोकांना पुण्यात आणण्यात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
५०० रुपये देऊन आधार कार्ड बनविले
दरम्यान, अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने देहू रोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली. तो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून कपडे आणून विकत असे. त्याने भिवंडीतील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता केवळ ५०० रुपये देऊन आधार कार्ड घेतल्याचे तपासात समोर आले आहे. भिवंडीतील एजंटांनी आधार केंद्रात खानच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे त्याला आधार कार्ड मिळाले जे त्याची भारतीय ओळख बनले. त्यानंतर त्याने पत्नीचेही आधार कार्ड घेतले, असे पोलिसांनी सांगितले.
पुण्यातील एका मशिदीत भेटलेल्या एका कमालभाईनी खानला सुपारी व्यवसायाबद्दल सांगितले. त्यानुसार खानने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली. याच काळात तो देहू रोड येथील गांधीनगर मधील रहिवाशी चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला. कांबळेच्या घराला लागून त्यांची मोकळी जागा होती. पोलिसांनी सांगितले की, खानने कांबळे यांची अंदाजे ६०० चौरस फूट जागा ८०,००० रुपये रोख देऊन “खरेदी” केली. त्यांनी सदर व्यवहाराचे कोणतीही कागदपत्रे तयार केली नाहीत.
खानने जमीन ताब्यात घेऊन त्यावर घर बांधले. कोणत्याही पोलिस यंत्रणेच्या निदर्शनास न येता, खान भारतीय नागरिक असल्याचे भासवत सुमारे एक दशक आपल्या कुटुंबासह येथे राहत होता. त्याने मुलीला जन्म दिला, सुपारी विक्रीचे काम करताना भारतीय पासपोर्ट मिळवले.
परंतु, जुलैमध्ये महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस शाहीद उर्फ सोहिद्दुल शेख (३५) या संशयितासह खानच्या घरी धडकले. शेख रोहिंग्या असून पोलिसांनी त्याला देहूरोड भागातचा पकडले होते. २०१५ पासून तो आपल्या पत्नीसह भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. चौकशी दरम्यान शेखने पोलिसांना सांगितले की देहू रोडचा “मुजम्मिल मामू” हा देखील म्यानमारचा नागरिक आहे. त्यानंतर पोलिसांनी मुजम्मील खानला ताब्यात घेतले.
देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या देहूरोड पोलिस ठाण्यात २७ जुलै २०२४ रोजी शेख, खान आणि त्यांच्या पत्नींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांकडून सेल फोन, सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशी चलन, शेख, खान आणि शफीका यांना जारी केलेले भारतीय पासपोर्ट जप्त केले. खानचे “मौलाना कोर्स” प्रमाणपत्र, त्याचे नाव आणि छायाचित्र असलेले म्यानमारचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे, असे ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयितांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
इंडियन एक्स्प्रेस प्रतिनिधीने दोन वेळा देहू रोड येथील खानच्या घरी जाऊन त्याच्यासोबत बोलण्याच्या प्रयत्न केला. मात्र घराला कुलूप होते. तो आणि त्याचे कुटुंबीय उपलब्ध नव्हते. खानला तिची जमीन विकणाऱ्या चंद्रभागा कांबळेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना त्याच्या परदेशी नागरिकत्वाची माहिती नव्हती. कांबळे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आणि ती जमीन अजूनही सरकारी रेकॉर्डवर तिच्या मालकीची आहे, तर खान यांच्या नावावर वीज बिल आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पासपोर्ट रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश
पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्यानमारमधील मुजम्मिल खान आणि इतर संशयितांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतून या वर्षी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशातील अनेक घुसखोरांकडून भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाअंती, पोलिसांनी पुणे आणि गोव्यातील पासपोर्ट कार्यालयांना बांगलादेशी आणि म्यानमारच्या नागरिकांनी बेकायदेशीररीत्या मिळविलेले जवळपास ६५ भारतीय पासपोर्टची माहिती दिली.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी टेररिस्ट ब्युरोचे (एटीबी) सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. राऊत यांनी सांगितले की, काही बांगलादेशी भारतीय पासपोर्ट वापरून परदेशातही गेल्याचे तपासात उघड झाले आहे. एटीबीचे प्रमुख पोलिस उपायुक्त शिवाजी पवार म्हणाले की, संशयास्पद परदेशी नागरिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.