पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थच्या मावळमधील पराभवाचा बदल घेणार असल्याचे उपरोधिकपणे वक्तव्य करणारे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार मंगळवारी रात्री हिंजवडीतील बगाड यात्रेत एकत्र आले होते. बगाडावर चढताना पार्थने रोहित पवारांना हात दिला. गर्दी असल्यामुळे दोघेही एकमेकांना आधार देत होते. राजकारणात कितीही कटुता आली असली तरी तिसऱ्या पिढीने नातेसंबंध घट्ट असल्याचा संदेश दिल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आहे. बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. सगळे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारात उतरल्याचे दिसते. तर, अजित पवार यांच्याकडून कुटुंबियांनी एकटे पाडल्याचे सांगितले जाते. पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हेही वाचा…पुणे : चोरट्याने घेतला पोलीस शिपायाचा चावा

मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रोहित पवार मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. बरेच काही पचविण्यासाठी पुत्र पार्थचा पराभव पचवत ज्याने पराभव केला, त्याचाच आता उपमुख्यमंत्री अजित प्रचार करत आहेत. पण, मी पार्थच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मावळमध्ये आलो असल्याचा उपरोधिक टोला रोहित यांनी लगाविला होता.

हेही वाचा…होऊ दे चर्चा..! महायुतीचे श्रीरंग बारणे की महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरेंच्या रॅलीत गर्दी?

त्यानंतर रात्री बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या हिंजवडीच्या बगाड यात्रेत पार्थ आणि रोहित पवार एकत्र दिसले. बगाडावर चढताना पार्थ यांनी रोहित यांना हात दिला. बगडावर गर्दी जास्त असल्यामुळे दोघांनी एकमेकांना आधार दिला. दोघांनी काहीवेळ हसत संवाद साधला. त्यामुळे राजकारणात कितीही कटुता आली असली तरी तिसऱ्या पिढीने नातेसंबंध घट्ट असल्याचा संदेश दिला. याबाबतची चित्रफीत आणि छायाचित्रे समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit and parth pawar show unity at bagad yatra supporting each other due to crowd pune print news ggy 03 psg
Show comments