पुणे : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा’साठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले नसल्याचा, उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा, राजकीय नेत्यांच्या शाळांना पारितोषिके दिल्याचा आरोप प्रकल्पाचे संचालक रोहित आर्या यांनी पत्रकार परिषदेत केला. या विरोधात आर्या यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, सरकारच्या नियमानुसार आर्या यांना पैसे दिले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, उत्तमनगर परिसरात अपघात

शालेय विद्यार्थी स्वच्छतादूत होण्यासाठी ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर’ हा प्रकल्प २०१३ मध्ये गुजरातमध्ये सुरू केला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. त्यानंतर आर्या यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात उपक्रम सुरू केला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार आर्या यांनी २०२२ मध्ये स्वखर्चाने राबवला. या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम पाहून शिक्षण विभागाने २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात समावेश केला. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर मला बाजूला करून प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आला. माझ्या कामाचे पैसे देण्याबाबत पाठपुरावा करूनही टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे जुलैपासून उपोषण सुरू केले. अनेक बैठका होऊनही कार्यवाही न झाल्याने केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केल्यावर त्यांनी वैयक्तिक स्वरूपात दोन धनादेश दिल्याचे आर्या यांनी सांगितले. दरम्यान, कोणताही उपक्रम राज्य शासनाच्या चौकटीत राहून राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती मागवली आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर शासनाच्या नियमानुसार जे द्यायचे आहे ते आर्या यांना दिले जाईल. तोपर्यंत वैयक्तिक स्वरूपात दोन धनादेश दिले आहेत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit arya allegations on maharashtra government for non payment of money for school campaign pune print news ccp14 zws