अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना घेऊन अजित पवार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या बंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार म्हणाले, “अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारबरोबर जातील याचा अंदाज कुणालाही नव्हता, पण भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडेल याचा नक्कीच काही प्रमाणात अंदाज होता. कारण आज लोकांचा भाजपाला पाठिंबा राहिला नाही. त्यामुळे भाजपा शिवसेनेला जसं फोडलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसला फोडेल असा अंदाज होता.”

“भाजपा हे विसरून गेले की, ते एकटे राहिले तरी…”

“लोकनेत्यांनी सुरू केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष भाजपाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यापासून रोखू शकत होत्या. हे भाजपाला माहिती असावं. त्यामुळे या पक्षांना फोडलं की आपण शेवटी एकटं राहू असं त्यांना वाटतं. ते हे विसरून गेले की, ते एकटे राहिले तरी लोक आपल्याला निवडून देतात,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: ‘शरद पवार’ हे दोन शब्द सोडून सगळं बोलले अजित पवार

रोहित पवारांचा बंडखोर व भाजपाला इशारा

“हे सर्व पाहता इतर ठिकाणी हे प्रकार यशस्वी होऊ शकतात, पण महाराष्ट्रात हे जमणार नाही. कारण लोक हे जमू देणार नाहीत,” असं म्हणत रोहित पवारांनी बंडखोरांना आणि भाजपाला सूचक इशारा दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar big statement after ajit pawar rebel in ncp pbs