पुणे : “भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक अखेरपर्यंत पक्षासोबत राहिल्या. त्या आजारी असतानादेखील त्यांनी दोन वेळा विधिमंडळात येऊन मतदान केले. त्याचदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी देतील, असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे, या मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज असून, येथील नागरिक भाजपाला त्यांची निश्चित जागा दाखवतील,” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. कसब्यात प्रचार रॅलीसाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आजच्या प्रचार रॅलीत काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेस पक्षाचे लातूरचे धीरज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई हे सहभागी झाले होते. रोहित पवार यांनी कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केला. यावेळी रोहित पवार यांनी मुक्ता टीळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न दिल्याबाबत भाजपावर निशाणा साधला.
हेही वाचा – कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीसांनी घेतली पुनीत बालन यांची भेट
रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. बापट साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बाहेर पडू नये, असा सल्ला असतानादेखील ते प्रचारासाठी काल आले. यातून भाजपाची प्रवृत्ती दिसून येत असून, भाजप माणूसकी विसरले आहे, असे सांगत त्यांनी भाजपाच्या नेतृत्वावर टीका केली.
या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते मतदारसंघात आल्याने त्यांची परिस्थिती काय झाली आहे ते दिसते आहे. तसेच, भाजपाच्या प्रचारामध्ये गुंडदेखील सहभागी झाले असून, हे कसबा मतदारसंघातील नागरिक स्वीकारणार नाही. त्यामुळे, या निवडणुकीत
एक नंबरवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर राहतील आणि विजयीदेखील होतील. तर दोन नंबरवर आनंद दवे राहतील, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपाचे नाव न घेता तिच्यावर टीका केली.
केंद्र आणि राज्य सरकारबद्दल नागरिकांमध्ये चीड : धीरज देशमुख
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चीड आहे. तसेच मागील काही महिन्यांतील कसबा मतदारसंघातील घडामोडी लक्षात घेता, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येतील, असा विश्वास लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
भाजपाची केविलवाणी अवस्था झाली : विश्वजीत कदम
गिरीश बापट यांनी अनेक वर्षांपासून कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी. ते बरे नसतानादेखील त्यांना प्रचारामध्ये आणणे म्हणजे भाजपाची केविलवाणी अवस्था झाल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला नागरिक जागा दाखवतील : वरुण सरदेसाई
पुणे शहरात अनेकवेळा पक्षबांधणीच्या कामासाठी आलो आहे. पण आज महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आलो आहे. नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तसेच आम्ही मागील काही वर्षे युतीमध्ये होतो. त्यामुळे, ही जागा भाजपाकडे राहिली. पण यंदा कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला नागरिक नक्कीच जागा दाखवतील, असा विश्वास ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.