महाराष्ट्रीत लोकसभेची निवडणूक ही अनेक विषयांमुळे चर्चेत राहिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये फूट पडली. शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपला वेगळा गट तयार केला होता. तर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेश पक्षाशी बंडखोरी करून आपल्या नेत्यांची वेगळी फळी निर्माण केली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एकटे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीपेक्षा अधिक जागा पटकावत विरोधकांना चांगलीच चपराक दिली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर असून शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी विजयी भावमुद्रेने विरोधकांवर टीका केली.
सुनील तटकरे म्हणाले, चार ते पाच आमदार हे काँग्रेसमध्ये जाऊ इच्छितात, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटाचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, आणि १८ ते १९ आमदार हे शरद पवार आणि नेत्यांच्या संपर्कात आहे. निष्ठावंत आमदार जे अडचणीच्या काळात शरद पवार यांच्यासोबत होते त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल तर जे सत्तेत जाऊन आले त्यांना दुसरे प्राधान्य दिले जाईल, असे रोहित पवार एबीपी माझ्याच्या प्रतिनिधीला म्हणाले.
मी पक्ष सोडणार असे म्हणालो नाही
जे कोणी विचाराच्या विरोधात लढले आहेत, लोकसभेमध्ये आपला उमेदवार पडावा यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या नेत्यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत, असे लोकं जर परत येणार असतील आणि कष्ट घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यावर हेच लोक बसणार असतील त्यावेळेस माझी भूमिका वेगळी असेल, असे मी म्हणाल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
केवळ दादाच असतील
धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे यांच्याविषयी विचारले असता, “केवळ दादाच असतील, इतर नावे भाजपबरोबर गेल्याचे आपल्याला पहायला मिळतील”, असेही रोहित पवार म्हणाले.