पुणे : बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरतीचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्याबाबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एका शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात तीन कंत्राटी कर्मचारी काम करू शकतात’ असे विधान केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> समाविष्ट ११ गावांचा विकास पुन्हा लांबणीवर… जाणून घ्या कारण

एक्स या समाजमाध्यमात केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून, बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.

हेही वाचा >>> ‘टूबीएचके’एवजी ‘थ्रीबीएचके’ला पसंती! किमती वाढूनही ग्राहकांचा मोठ्या घरांकडे कल

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, ‘शासन आपल्या दारी’च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी, त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची या वर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल, तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारच्या धोरणावर हल्ला चढवला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar criticized maha government over competitive exams contract to private company pune print news ccp 14 zws
Show comments