चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी नुकताच पुणे दौरा केला.
पुणे दौऱ्यावर येऊनही अमित शाह यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा प्रचार करणं टाळलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. अमित शाह यांनी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात निकाल काय लागणार? हे अचूक हेरलं आहे, त्यामुळेच त्यांनी येथे प्रचार केला नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले,”अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनीतिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपाविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!”
हेही वाचा- “…तर मी मेलोच असतो”, बावनकुळेंच्या त्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
रोहित पवारांच्या ट्वीटनंतर अमित शाहांनी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात प्रचार का टाळला? याबाबच राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.