आम्ही शरद पवारांचा नाद सोडला आणि दुसऱ्या नादाला लागलो, अशी खोचक टीका शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपरी- चिंचवडमध्ये आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवरही भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस ४० खोक्यांखाली चिरडून…” संजय राऊत यांचा खोचक टोला

काय म्हणाले रोहित पवार?

राजकीयदृष्ट्या शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, जर तुम्ही त्यांच्या नादी लागलात, तर तुमचं उद्या काय होईल, हे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेना पक्ष फुटला, पक्षाचे चिन्ह आणि पक्ष आता उद्धव ठाकरेंच्या हातात राहिला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात नागरिकांना धीर दिला. अनेक कामं त्यांनी केली आहेत.

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावरून भाजपाला केलं लक्ष्य

यावेळी बोलताना त्यांनी अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावरूनही भाजपाला लक्ष्य केलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अमित शाह आले होते. परंतु, अनेक सर्वे भाजपाच्या विरोधात असल्याने त्यांनी इथे सभा घेतली नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून चिंचवडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे ५० हजार मतांनी निवडून येतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावरचा निकाल कधी येणार? अनिल देसाई यांनी दिलं उत्तर, म्हणाले..

मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर रोहित पवारांची टीका

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यात रॅली होती. त्यांच्या रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद दिसला नाही. ते चिंचवडमध्ये असताना त्यांच्या कार्यकर्त्याने ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना मारहाण केली. शहरात तुम्ही दडपशाही, गुंडशाही करत आहात, अशी परिस्थिती राष्ट्रवादीच्या कार्यकाळात नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, मुख्यमंत्री प्रचारात मग्न

एमपीएसचीचे विद्यार्थी आंदोलन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारात मग्न आहेत. आज तरुणांसोबत शरद पवार यांनी वेळ दिलेला असताना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही बैठक झाली नसावी, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेलाही रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत. ते स्टंटबाजीसाठी काहीही ट्वीट करतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reaction on bharat gogavale statement on sharad pawar kjp 91 spb