लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील पत्रकार परिषदेत मी आणलेला खेकडा हा हॉटेलमधील होता. तो पुन्हा नदीत सोडण्यात आला. या संदर्भात पेटा संस्था आपले काम करत आहे. या प्रकरणात मला अद्याप कुठलीही नोटिस मिळालेली नाही. मी आणलेल्या खेकड्याविषयी चर्चा करण्यापेक्षा जो खेकडा राज्याची तिजोरी फोडतोय त्याबद्दल बोला. मी भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली. तसेच पुन्हा पत्रकार परिषद घेऊन नवा घोटाळा बाहेर काढण्याचे सुतोवाचही पवार यांनी या वेळी केले.
आणखी वाचा-रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएल लिलाव प्रक्रियेदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बारामतीत मतदार संघात सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय मनापासून घेतला, की त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली हे पहावे लागेल. अर्थात, अशा छोट्या प्रकरणांनी बारामती डगमगणार नाही. बारामती सुप्रिया सुळेंच्याच मागे राहील आणि सुप्रिया ताई पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.