पुणे : लोकसभा निवडणुकीला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असून राज्यात अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही.तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून चर्चाच सुरू आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापपर्यंत घोषणा जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या हवेली तालुक्यातील भेकराईनगर भागात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत, राज्यातील अनेक घडामोडी बाबत त्यांनी भूमिका देखील मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील अनेक भागातील महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार संघामधून महायुतीकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जात नाही. त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघासाठी अजित पवार यांच्याकडून जे कोणी उमेदवार असतील. त्यांच्या बाबत अजित पवार यांच्याकडून ९ सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये अजित पवार यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर सुप्रिया सुळे या त्यांच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजेच दहावा सर्व्हे करतील आणि योग्य असा निर्णय घेतील, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्यानी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत अजित पवारांना त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील काही महिन्यांत भाजपने देशात आणि राज्यात पक्ष, कुटुंब फोडाफोडीची जी कार्यपद्धती अवलंबली आहे.त्यावर भाजपचे अनेक नेते मंडळी नाराज आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यामुळे एकूणच परिस्थिती बघता,भाजपला त्यांचाच भाजपचा मतदार मतदान करणार नसल्याचे हे दिसून येत असल्याचे सांगत भाजप नेतृत्त्वावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा : पुणे : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा डिलिव्हरी बॉय अटकेत; नऊ लॅपटॉप, मोबाइल, दुचाकी जप्त

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा देऊन शरद पवार गटा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, आमदार निलेश हे अजित पवार यांच्याकडे होते.त्यावेळी सातत्याने निलेश लंके यांना मतदार संघातील नागरिक भेटून सांगत होते की, जर तुम्ही साहेबांसोबत असला तर आम्ही तुम्हाला मतदान करू, त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा बोलावून दाखवली आणि आता निलेश लंके हे साहेबासोबत आल्याने त्यांचे मताधिक्य चांगलेच असणार आहे. बलाढ्य शक्ती विरोधात सामान्यांची शक्ती अशी लढत होणार आहे. त्यामध्ये सर्व सामान्य नागरिक निलेश लंके यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांना खासदार करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar said supriya sule will win baramati lok sabha poll with margin of 2 lakh 50 thousand votes svk 88 css