भारतीय जनता पक्षाकडून समाजमाध्यमाचा वापर अप्रतिम रितीने केला जातो. त्यामुळे आम्ही समाजमाध्यम वापराबाबत त्यांच्याकडून शिकतो असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मांडले. आपले काम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आता समाजमाध्यमे वापरण्याची सक्ती झाल्याचा सूरही व्यक्त झाला.

डिमिप्रेमी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि मिरॅकल इव्हेंट्स यांच्यातर्फे आयोजित मराठी सोशल मीडिया संमेलनातील राजकारणातला सोशल मीडिया या सत्रात पवार बोलत होते. या सत्रात पवार यांच्यासह पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार योगेश कदम, भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्वाभिमानी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी संवाद साधला.

शासकीय पदावर नसल्याने समाजमाध्यमात परखडपणे मत मांडू शकतो. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर उपयुक्त आहे. समाजमाध्यमात व्यक्त न झाल्यास लोकांना कळणार नाही आपण काय काम करतो. जितके जास्त ट्रोलिंग होते, तेवढे आपले काम अधिक चांगले होते असे मला वाटते. माझ्या स्वभावानुसारच समाजमाध्यमाचा वापर करतो. निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमाचा वापर कमी होऊन व्हॉट्सॲपचा वापर वाढतो. संपर्कासाठी कोणतेही माध्यम सोडून चालत नाही. भाजपाकडून समाजमाध्यमाचा वापर अप्रतिम केला जातो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून शिकतो, असे पवार यांनी सांगितले.

करोना काळात रुग्ण नियोजनाचे काम करत असताना आमदार हरवल्याची टीका सुरू झाल्याचा अनुभव सांगत त्यामुळे नियमित समाजमाध्यमांत दिसत राहाणे आवश्यक असल्याचे भुयार यांनी नमूद केले. प्रत्येक माध्यमावर सरसकट व्यक्त होऊन चालत नाही. समाजमाध्यमातील वागणुकीची आचारसंहिता आपली आपण ठरवली पाहिजे. समाजमाध्यम म्हणजे दृष्टिकोन विरुद्ध वास्तव आहे. समाजमाध्यमाचा वापर ही एक विकसित होत जाणारी कला आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

सरकारचे प्रतिनिधित्त्व करताना जबाबदारीने समाजमाध्यमांचा वापर करावा लागतो. कोणी दुखावले जाणार नाही याचे भान ठेवावे लागते. वैयक्तिक आयुष्य आणि काम याचा समतोल साधावा लागतो. समाजमाध्यम वापर ही आता सक्ती झाली आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वांत महत्त्वाचे साधन. समाजमाध्यमांचे विश्लेषण करून वैविध्यपूर्ण आशय राखण्यासाठी विचार करावा लागतो. समाजमाध्यमे वापरली तरी प्रत्यक्ष संवादाला पर्याय नसल्याची भावना तटकरे यांनी व्यक्त केली. समाजमाध्यम ही क्रांती आहे. राजकारण्यांकडून प्रचारासाठी त्याचा वापर केला जातो. नकारात्मक टीकेतून काही गोष्टी शिकायलाही मिळतात, असे कदम म्हणाले.