पिंपरी : बारामती अॅग्रोमध्ये कोणतेही चुकीचे काम झाले नाही. अंमलबजावणी संचानलायाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या लिखित, तोंडी प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. मला नोटीस आली नाही, जेव्हा येईल, तेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती देईल. गेल्या सात दिवसात भाजप आणि अजित पवार मित्र मंडळाचे कोण कोण दिल्लीला गेले होते, त्यांच्या प्रवासाची माहिती काढा, यावरून सर्व गोष्टी कळतील असे सांगत त्यांच्या सांगण्यानुसारच कारवाई झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे चिंचवडमध्ये केला. ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते. त्यांच्यावरील कारवाया का थांबवण्यात आल्या आहेत? असा सवालही रोहित पवार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वरपे, सुनील गव्हाणे यावेळी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले की, कारवाई होत असताना मी विचार, बाजू बदलणार नाही. मी भारताच्या बाहेर होतो. शुक्रवारी सकाळी कारवाई झाली. मी खरंच काही चुकीचे केले असते तर काल रात्री मी भारतात आलो नसतो. अजून पंधरा दिवस बाहेर राहिलो असतो. यापूर्वी ज्यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई झाली ते लोक दिल्लीला कोणाला तरी भेटायला गेले आहेत, नाही तर पक्ष बदल केले आहेत. मी घाबरलो नाही, मला याची सहानुभूतीही घ्यायची नाही. कारवाई का, कशी केली हे लोकांना माहिती आहे. यात अधिका-यांचे कुठेही काही चुकत नाही. त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या पद्धतीने ते येतात. कागदपत्रांची तपासणी करतात. कोणती कागदपत्रे जप्त केली याची माहिती माध्यमापर्यंत कशी गेली, यावरुनच काहींना राजकारण करायचे असल्याचे दिसते.

भाजपचे सरकार असताना गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), आयकर, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई झाली आहे. माझा विषय मोठा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सात दिवसात भाजपचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे कोण कोण दिल्लीला गेले होते, त्यांच्या प्रवासाची माहिती काढा, यावरून सर्व गोष्टी कळतील. मी चूक केली असती तर अजित पवार यांच्यासोबत जाऊन बसलो असतो. पण, मी गेलो नाही आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे. आम्ही लढत आहोत. तसेच महाराष्ट्र शिखर बँकेचा घोटाळा कधी, कसा झाला. राजकीय लोक बँकेवर असताना कोणत्या कंपन्या कोणाला विकल्या गेल्या हे बघावे. त्या यादीत कोणत्या नेत्यांची नावे आहेत, ती एक यादी सत्तेतील लोकांनी प्रसिद्ध करावी. त्यातील कोणाची चौकशी चालू होती आणि ती माणसे आज त्याच पक्षात आहेत की भाजपसोबत आहेत हे पहावे. भाजपकडे येण्यापूर्वी ज्या नेत्यांवर भाजपचे लोक बोलत होते, त्या कारवाईचे काय झाले. त्यांनी केलेल्या चुकांचे काय झाले. सामान्य जनता या सर्व गोष्टी डोळे उघडे ठेवून बघत आहे. विरोधात असलेल्या नेत्यांवर का कारवाई केली जाते हे जनतेला माहिती आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या गटातील पदाधिकारी, पोलीस कर्मचाऱ्याला मारले. त्यावर ते काहीच बोलले नाहीत, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

हेही वाचा : मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’वर ईडीची कारवाई

देवेंद्र फडणवीस ज्या शहरात जातात त्यादिवशी तिथे खून होतो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी,ज्या शहरात असतात. त्यादिवशी तिथे भरदिवसा खून होत आहेत. फडणवीस यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पद बाजूला ठेवावे आणि गृहमंत्री पदाला न्याय द्यावा नाही तर राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.