‘निर्भय बनो सभे’साठी पुण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडली. वागळे यांच्या गाडीवर शाईफेकही करण्यात आली. निर्भय बनो या सभेचं राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आलं होतं. निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्ते वागळे यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. तसेच हा कार्यक्रम होऊ नये साठी भाजपा पदाधिकारी प्रयत्न करत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना पुण्यात येण्यासही विरोध केला होता. तसेच प्रशासनाने या सभेस परवानगी देऊ नये अशी मागणीही भाजपाने केली होती. तरीदेखील हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्यावर हल्ला केला.
निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभा स्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. तसेच त्यांनी वागळे यांच्याविरोधात घोषणाबाजीदेखील केली. निखिल वागळे यांची गाडी सभास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या गाडीची पुढची आणि मागची काच फोडण्यात आली, गाडीवर शाईफेक करण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी या हल्ल्यावरून भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील’ असं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलं. मला त्यांना विचारायचं आहे की, ‘पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला कारणारेही कुत्रेच होते का? कुत्रे नसतील आणि भाजपाचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का?’
हे ही वाचा >> “सरकारची भूमिका स्पष्ट नाही”, मनोज जरांगे आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार; मराठा बांधवांना म्हणाले, “आपल्या आमदारांना…”
पोलीस काय म्हणाले?
दरम्यान, या हल्ल्याबाबत पुणे पोलीस म्हणाले, निर्भया बनो या कार्यक्रमाला आम्ही परवानगी दिली नव्हती. तरीदेखील निखिल वागळे या कार्यक्रमाला येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. कारण, दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर पुणे शहरांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे वागळे यांच्याविरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती. त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती. ते त्यांच्या खासगी गाडीतून निघाले. ते कार्यक्रम स्थळी जात असताना रस्त्यावर कोणीतरी त्याच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.