शरद पवार गटाने अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अधिक जोर लावला आहे. जयंत पाटील, रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्याचा धडाका लावला आहे. मंगळवारी पुन्हा शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. ते सामाजिक कार्यकर्त्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांपेक्षा शरद पवार गटाची चर्चा होत असल्याचं बघायला मिळत आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातदेखील राष्ट्रवादीचे दोन पक्ष निर्माण झाले आहेत. परंतु, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार गटाची सरशी दिसत आहे. दोन गट पडल्यापासून रोहित पवार यांनी आपलं पूर्ण लक्ष पिंपरी-चिंचवड शहरावर केंद्रित केल आहे. शहरामध्ये भाजपादेखील यामुळे काही प्रमाणात दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार
अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षांची शहरात चर्चा असून रोहित पवार आणि अजित पवार असे काका पुतण्याचं राजकारण शहरात बघायला मिळू शकतं. शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अनेक दिग्गज नेत्यांना शरद पवार गटात सामावून घेतलं आहे. आणखी काही नेते त्यांच्या संपर्कात असून ते लवकरच शरद पवार आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं.