लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सध्या दबाबतंत्राचे जाळे टाकण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. एकनाथ खडसे अटकेच्या भितीने पुन्हा भाजपामध्ये परतल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमपीएल लिलाव प्रक्रियेतून वेळ काढत रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी खडसे यांच्या भाजप परतण्यावर थेट भाष्य केले. मात्र, त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे टाळले. रोहित पवार म्हणाले, की खडसे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते वैयक्तिक अडचणीत सापडले आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती देखिल खालावलेली होती. सध्या भाजपाकडून अनेक राजकीय नेत्यांना अटकेची धमकी देऊन पक्षात घेतले जात आहे. असाच प्रकार खडसेंबाबतीतही झाला. त्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात आली.

आणखी वाचा-एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सत्तेत घेण्याचा निर्णय हा ब्लॅकमेलिंगचाच एक प्रकार आहे. राष्ट्रवादीतल्या या नेत्यांना भाजपकडून धमकावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अटकेची भीती होती म्हणूनच हे सर्व भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याचेही पवार म्हणाले. राजकीय काम करताना मी पुण्यातून अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. याची चौकशी केली, तर यातून सत्य बाहेर येईल या भीतीनेच या घोटाळ्यांबाबत कुणी स्पष्टीकरण देऊ शकत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांच्या सध्या मनस्थितीबाबत भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘ज्या विनोद तावडेंना राज्यातून विधानसभेचे तिकिट नाकारण्यात आले. त्यांनाच आता केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातील उमेदवार पसंतीचे अधिकार दिले जात आहेत. अशा वेळी देवेंद्र फडणवीसांना आपल्याला बाजूला केले जात असल्याची भीती वाटत असल्याने सध्या ते हताश वाटत असावेत.’