इंदापूर :
तू नभातले तारे, माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू, चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कवी, गझलकार सुरेश भटांच्या गझलेतील प्रेमिकांच्या या भावना प्रेमवीर विविध प्रकारे व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे चा आधार प्रेमवीरांना नेहमीच लाभतो. प्रेम वेगवेगळ्या भावनांनी व्यक्त होत असले तरी,त्याला गुलाबाचे फुल ही भावना अधिक उत्कट करतो. हवाहवासा वाटणारा हा काटेरी ‘गुलाब’ इंदापूर तालुक्यातील कळस सारख्या पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये माळरानावर फुलला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस ता. इंदापूर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता चांगलाच दरवळत आहे. येथील शेतकऱ्यांनी या आठवड्यात सुमारे ५० हजार फुलांची  विक्री केली आहे. व्हेलेडाईन डे मुळे दरात दुप्पट वाढ झाल्याने या फुलांनी जास्तच भाव खाल्ला आहे. यामुळे गुलाब उत्पादकांची कळी खुलली आहे.

व्हेलेडाईन डे ला न बोलता, फक्त फुलांमधून तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग प्रेमिक अवलंबितात. यामुळे गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली आहे. खडकवासला धरणाच्या पाण्यावर बहुतांशी क्षेत्र अवलंबून असलेल्या कळस गावात ही गुलाबाची शेती फुलली आहे. एकीकडे शेतीची पोत कमी होत आहे. त्यातच निसर्गाचा माराही सहन करावा लागतो. परंपरागत शेतीने अनेक शेतकरी संकटात सापडले. मात्र, येथील शेतकऱ्यांनी गुलाबाच्या टोचणार्या काट्याची तमा न बाळगता आपल्या श्रमातून गुलाबाची शेती फुलविली आहे.  

बाजारपेठेचा उत्तम अभ्यास, विक्रीचे कुशल तंत्र आणि त्यासाठी लागवडीचे चोख व्यवस्थापन यातून त्यांनी दर्जेदार गुलाबाची बागच नव्हे, तर त्यातून यश देखील फुलवले आहे. गुलाबाची शेती किमान सहा वर्षे टिकत असल्याने जमिनीची चांगली मशागत करावी लागते. या परिसरात ग्लॅडिएटर या जातीचे उत्पादन जास्त घेतले जाते. ग्लॅडिएटर फूल गडद लाल रंगाचे असते दांडा मोठा असतो. हे फूल खपाला चांगला प्रतिसाद देते चांगल्या फुटी येतात. त्यामुळे या गुलाबांची निवड केली जाते.

सध्या फुलशेती महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे यामध्ये गुलाबशेती हा महत्त्वाचा उद्योग होऊ शकतो. सर्व फुलांमध्ये गुलाबास वरचे स्थान आहे  गुलाबास ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. अत्तरे, सुगंधी तेल,गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक मानले जाते. गुलाबाची फुले केशशृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात. आजारी माणसाला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देताना गुलाबाची फुले दिली जातात. याशिवाय भावना व्यक्त करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो.

गुलाबाचा दर आकर्षक रंग, आणि गुणवत्तेवर ठरतो. बाजारपेठेत गुलाबाला वर्षभर विशेषतः गणपती, नवरात्र,दिवाळी, शिक्षक दिन, लग्नसराई मोठी मागणी असते. मात्र, तो सर्वाधिक भाव खातो तो व्हॅलेंटाईन दिनी. यावेळी मागणीही चांगली आणि दरही चांगला मिळतो. सरासरी दोन रुपयाला एक फूल विकले गेले. तर नफा चांगला राहतो मात्र व्हेलेडाईन डे ला चार रुपये बाजारभाव मिळतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rose farming in water scarce areas like kalas in indapur taluka pune print news mrj