बालकांना ‘रोटाव्हायरस’ या विषाणूमुळे होणाऱ्या जुलाब-उलटय़ांवरील लसीकरण प्रकल्प देशात सुरू करण्याआधी राबवण्यात येणाऱ्या ‘पायलट प्रोजेक्ट’मध्ये तामिळनाडू (वेल्लूर) आणि हिमाचल प्रदेशसह पुण्यातील चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे डिसेंबर २०१६ पासून या लशीचा समावेश लसीकरण प्रकल्पात करणे अपेक्षित असून पायलट प्रोजेक्टमधील लसीकरण मात्र याच वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकेल.
६ महिने ते २ वर्षे वयाच्या बाळांमध्ये रोटाव्हायरसमुळे होणारे जुलाब सर्वसाधारणपणे दिसतात. यातही एक वर्षांच्या आतल्या बाळांमध्ये प्रादुर्भाव अधिक आढळतो. विशेष म्हणजे हा विषाणू स्वच्छता पाळल्यानंतरदेखील पसरू शकतो. रोटाव्हायरस लशीचा पहिला डोस वयाच्या ६ आठवडय़ांनंतर देतात. काही कारणाने डोस न घेतल्यास पहिला डोस १६ आठवडय़ांपर्यंत व शेवटचा डोस ३२ आठवडय़ांपर्यंत देता येतो.
आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. रा. म. कुंभार म्हणाले, ‘राज्यात पुण्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांची केंद्रातर्फे सुरुवातीला लस देण्यासाठी निवड करण्यात आली असून लसीकरणाबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम पुढील महिन्यात सुरू होईल.’
देशात पायलट प्रकल्पाअंतर्गत असे एक लाख डोस दिले जाणार असून त्यात सहभागी होणाऱ्या बाळांची पुढील दोन वर्षे निगराणी ठेवली जाणार असल्याची माहिती भारती रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. ललवाणी यांनी दिली. ते म्हणाले,‘चार वर्षांपूर्वी देशात झालेल्या अभ्यासानुसार जुलाब-उलटय़ांमुळे रुग्णालयात भरती करावे लागणाऱ्या ४० टक्के बाळांमध्ये कारण रोटाव्हायरस असल्याचे समोर आले होते. रोटाव्हायरस लस घेतल्यानंतरही बाळांना या विषाणूमुळे होणारे जुलाब होतात, परंतु त्यांची तीव्रता खूप कमी असते, तसेच अशा बाळांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासत नाही. देशातील तीन कंपन्या या लशीच्या उत्पादनात असून ही लस तोंडावाटे देण्याची असल्यामुळे ती आरोग्य कर्मचारीही देऊ शकतील.’
लशीचे संभाव्य दुष्परिणाम काय?
‘रोटाव्हायरस लशीच्या संभाव्य दुष्परिणामांमध्ये एक आतडे दुसऱ्या आतडय़ात जाऊन बसण्याचा (इंटसससेप्शन) समावेश आहे. परंतु ही गुंतागुंत अतिशय दुर्मिळ असून लशीचे फायदे खूप आहेत.’
– डॉ. एस. के. ललवाणी, बालरोगतज्ज्ञ
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2015 रोजी प्रकाशित
‘रोटाव्हायरस’ लसीकरणासाठी सुरुवातीला पुण्यातील चार तालुक्यांची निवड
‘रोटाव्हायरस’ या विषाणूमुळे होणाऱ्या उलटय़ांवरील लसीकरण प्रकल्प राबवण्यात येणाऱ्या हिमाचल प्रदेशसह पुण्यातील चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 01-10-2015 at 03:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rotavirus vaccine four taluke selection