१४ फेब्रुवारी २०१६ चा व्हॅलेंटाईन डे मला अजून आठवतो. मी आणि माझा मित्र सुरेश बोर्डे एफसी रोडवर भटकत असताना, व्हॅलेंटाईन डेच्या गुलाबी वातावरणाशी विरोधाभास ठरावं असं एक दृश्य मला दिसलं. फुटपाथवर दोन तीन आडोसे कसेबसे जमवून घर म्हणून उभ्या केलेल्या एका झोपडीत एक अवघ्या पाच वर्षांचा मुलगा विटांच्या चुलीत जाळ पेटवून भात शिजवायची खटपट करत होता. त्याच्याशी गप्पा मारल्यावर समजलं, त्याचा मामा रोजंदारीवर गेला होता, त्याला रांधून जेवू घालण्याच्या कामावर या लेकराची नेमणूक झाली होती. त्यासाठी खानदेशातून हे मामा-भाचे इथे आले होते. खेळण्याबागडण्याच्या वयात त्याची ती स्वयंपाकाची धडपड बघून मला गलबललं. त्याला मामाने कुणाकडून काही घ्यायचं नाही असे बजावल्यामुळे खाऊ देऊ का विचारल्यावर तो नाहीच म्हणत होता, पण त्याच्याबरोबर आम्हीही खाऊ म्हटल्यावर तो तयार झाला. त्या वेळी त्याच्या डोळ्यात पाहिलेला आनंद कुठल्याही शब्दात सांगता येणं शक्य नाही.
रोटी डे कसा सुरु झाला, या प्रश्नावर, अमित कल्याणकर हा मध्यमवर्गीय घरातून आलेला, अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करणारा तरुण त्याचा अनुभव सांगायला सुरुवात करतो. चुलीसमोर रांधणारे ते छोटे हात आपल्यालाही दिसू लागतात आणि रोटी डे ही कल्पना उलगडायला सुरवात होते. व्हॉटसअॅपवर काही मेसेज आला की आपल्या ग्रुप्सवर तो फॉरवर्ड करायचा हे आता जणू नेमून दिलेलं काम झालं आहे. एफसी रोडवरच्या याच प्रसंगानंतर कधीतरी ‘काश कोई रोटी डे होता..’ अशा आशयाचा एक मेसेज व्हॉटसअॅपवर आला. तिथे रोटी डे अमितला पहिल्यांदा क्लिक झाला. अमितनेही मग तो मेसेज आपल्या ग्रुप्सवर फॉरवर्ड केला.
रिप्लाय म्हणून लाईकचे थम्ब्सअप धडाधड येऊन पडले. पण हे एवढंच पुरेसं नाही म्हणून अमित कामाला लागला. याही वेळी त्याचा मित्र सुरेश होताच. ही कल्पना गांभीर्याने घेत दोघे कामाला लागले.
अमित सांगतो, दहा दिवसात जमली तेवढी तयारी केली आणि एक मार्च २०१६ हा पहिला रोटी डे साजरा झाला. तेवढय़ा तयारीवर आम्ही पाचशे लोकांपर्यंत रोटी डे पोहोचवला आणि त्या पाचशे लोकांनी गरजूंपर्यंत रोटी पोहोचवली. म्हटलं तर हा प्रतिसाद फार मोठा नव्हता, म्हटलं तर अगदी छोटाही नव्हता. पण या अनुभवाने मला भरपूर प्रेरणा दिली. २०१७ मध्ये मी जानेवारी महिन्यातच रोटी डे साठी तयारीला लागलो. वर्षभरात नव्यानं जोडल्या गेलेल्या, वेगवेगळ्या शहरातल्या मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले. त्यातून होणाऱ्या चर्चामधून गरजूंना तयार अन्न देण्याबरोबरच स्वयंसेवी संस्थांना शिधा स्वरुपात धान्य देण्याची कल्पना पुढे आली.आम्ही मग अशा स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करुन, त्यांची गरज जाणून घेतली आणि तो डेटा संबंधित शहरांच्या ग्रुपवर प्रसिद्ध केला. त्यावर्षी रोटी डे राज्यभरातल्या सुमारे ४० हजार लोकांपर्यंत पोहोचला.
यंदाचं वर्ष या उपक्रमाचं तिसरं वर्ष होतं. यंदाचाही रोटी डे प्रचंड यशस्वी झाला. अमित सांगतो, रोटी डे ची सुरुवात पाहता आत्ता तिसऱ्या वर्षी त्याला मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. कोल्हापूर, नाशिक इथे दर महिन्याचा तिसरा रविवार रोटी डे म्हणून साजरा व्हायला सुरवात झालीये. पण एरवी अनेक डेज उत्साहाने साजऱ्या करणाऱ्या तरुणांचा याला हवा तेवढा प्रतिसाद नाही. त्यामुळेच पुढच्या वर्षीचं माझं टोर्गेट रोटी डे कॉलेजिअन्स मध्ये पोहोचवणं हे मी आत्ताच ठरवलंय!
व्हॉटसअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारखी समाजमाध्यमं म्हणजे निर्थक लाईक, शेअर आणि फॉरवर्डचा खेळ असं समीकरण अनेकांच्या डोक्यात अगदी पक्क झालंय. पण अमितने सुरु केलेली रोटी डे ही कल्पना चळवळीच्या रुपात बदलली तीही याच लाईक, शेअर आणि फॉरवर्डमुळे. समाजमाध्यमाचा तोच सकारात्मक चेहरा आहे!
भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com