पुणे : व्यायाम करताना सकाळच्या वेळी राॅटव्हीलर जातीच्या श्वानाने अभियंत्याला चावा घेतला. त्यामध्ये अभियंत्याच्या हाताला आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी श्वानाला हाताळणाऱ्या व्यक्तीवर (हॅण्डलर) बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभि (पूर्ण नाव, पत्ता समजला नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुयोग राऊत (वय ४९, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ मार्च रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पाषाण परिसरातील वीरभद्रनगरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर घडला. पाळीव श्वानामुळे मानवी जीवितास होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही खबरदारी न घेता श्वानाला मोकळे सोडले. या श्वानाने हल्ला करून राऊत यांना जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे पॅनकार्ड क्लब रस्त्याने व्यायाम (जाॅगिंग) करत जात होते. सकाळी साडेसातच्या सुमारास वीरभद्रनगरकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये असताना त्यांना पाठीमागून कोणी तरी धावत येत असल्याचा आवाज आला. काही समजण्याआधीच श्वानाने अंगावर झेप घेऊन राऊत यांच्या हाताचा पंजा आणि मनगटाचा चावा घेतला. त्या वेळी श्वानाला हाताळणारा पळत आला आणि बेल्ट लावून त्याने श्वानाला ताब्यात घेतले.

राऊत यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अभि नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा श्वान नयनाज इराणी यांचा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सकाळच्या वेळी श्वानाला फिरवण्यासाठी घेऊन येणारे हॅण्डलर, त्यांचे मालक अनेकदा श्वानांना रस्त्याने मोकळे सोडून देतात. व्यायाम करण्यासाठी, तसेच फिरण्यासाठी जाणाऱ्या अनेकांना श्वानाने चावा घेतल्याच्या घटना यापूर्वीदेखील शहरात घडल्या आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.