जकात रद्द झाल्यानंतर लागू होणाऱ्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विषयी सविस्तर माहिती देण्याच्या हेतूने पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरीत आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यापाऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. शिट्टय़ा, घोषणा व हुल्लडबाजी करत जवळपास अडीच तास सुरू असलेल्या या गोंधळातच आयुक्तांनी मार्गदर्शनाचा वर्ग उरकला. यानिमित्ताने व्यापारी व महापालिका आमने-सामने आले असून दोन्हीकडून आपल्या मुद्दय़ावर ठाम राहण्याच्या भूमिकेने आगामी काळात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.  
एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या एलबीटीची सविस्तर माहिती देण्यासाठी आयुक्तांनी आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यास व्यापाऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे व्यापारीही तेथे एकत्र आले. काही वेळातच गोंधळाला सुरुवात केली. सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती, बाहेरही मोठय़ा संख्येने व्यापारी होते. जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी प्रास्तविक करण्यास सुरुवात करताच एलबीटीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर आरडाओरड, गोंधळ वाढू लागला, त्यामुळे कार्यशाळा काही वेळ थांबवावी लागली. व्यापाऱ्यांच्या गोंधळाकडे आयुक्त हताशपणे पाहत होते. त्यांनी गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ करायचाच, असे ठरवून आलेल्या काही जणांनी हुल्लडबाजी सुरूच ठेवली. शेवटी गोंधळातच काम सुरू ठेवण्याची सूचना आयुक्तांनी मुंढे यांना केली. एलबीटीच्या तरतुदींची माहिती मुंढे देऊ लागले. त्यानंतर बाबर व त्यांचे समर्थक व्यापारी बाहेर आले. प्रवेशद्वारासमोरच त्यांनी धरणे धरले. तेथे भाषणे व घोषणाबाजी सुरू झाली. त्याचवेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या परिस्थितीची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन विधाते घटनास्थळी आले. बाहेर गोंधळ व आत मार्गदर्शन सुरू होते. एलबीटीचा निर्णय राज्य शासनाचा असून आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत. एलबीटी रद्द करण्याचे अधिकार शासनाला आहेत, आम्हाला नाही. तुमचे म्हणणे शासन स्तरावर मांडा, असा मुद्दा आयुक्त पटवून देत होते. तर, व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. थोडय़ा वेळानंतर बाबर तेथून निघून गेले. तेव्हा गर्दी कमी होऊ लागली. अखेर गोंधळात कार्यशाळेचे काम पाचच्या सुमारास संपवण्यात आले. या सगळ्या प्रकारात संत तुकारामनगर भागातील रहिवाशांना मोठय़ा प्रमाणात मनस्ताप झाल्याचे दिसून येत होते.
 एलबीटीविषयी गैरसमज नको- आयुक्त
एलबीटी ही नवीन करप्रणाली असून त्याविषयी शंका असणे स्वाभाविक असले तरी नाहक गैरसमज अथवा भीती बाळगू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे. नवीन व्यवस्था असून ती रुळायला वेळ लागणार आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी आम्ही आणखी कार्यशाळा घेऊ, अशी हमी त्यांनी दिली. पिंपरीतील कार्यशाळेत झालेल्या गोंधळाविषयी तसेच खासदारांच्या आंदोलनाविषयी भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.