पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांचा वाहनतळ रेल्वे प्रशासनाने सूचना केल्यानंतर हटविण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाने आदेश देऊनही रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आपला वाहनतळ तसाच सुरू ठेवला आहे. यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी आदेश देऊनही रेल्वे सुरक्षा दल जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे स्थानकाच्या आवारात लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यासमोरच लोहमार्ग पोलिसांचा अनेक वर्षांपासून वाहनतळ सुरू होता. तिथे केवळ पोलिसांच्या वाहनांसाठी वाहनतळ, असा फलकही लावण्यात आला होता. हा वाहनतळ हटवून पोलिसांनी त्यांची वाहने रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयाशेजारी असलेल्या वाहनतळात लावावीत, असे पत्र अनेकदा रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांनी पाठविले होते. अखेर लोहमार्ग पोलिसांनी १४ ऑगस्टपासून हा वाहनतळ हटविला.
हेही वाचा – पुणे : मुंढवा, हडपसर भागात होणार १७० कोटींचे रस्ते, जाणून घ्या कसे?
लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारीच रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पोलीस ठाणे आहे. त्यांनीही लोहमार्ग पोलिसांप्रमाणे पोलीस ठाण्यासमोर वाहनतळ सुरू केला होता. त्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचा वाहनतळ हटविण्यास सांगण्यात आले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाने वाहनतळ हटविला नाही. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अंतर्गत येत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाकडूनच त्यांच्या आदेशाचे पालन न झाल्याचे समोर आले आहे.
आधीही रेल्वे सुरक्षा दलाकडून विरोध
रेल्वे पोलीस दलाच्या वाहनतळाच्या जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निश्चित झाले होते. याबाबत रुबी हॉलचे पथक ऑगस्ट महिन्यात पाहणीसाठी स्थानकावर आले होते. त्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर गेला. त्या वेळी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी हा विरोध केल्याचे समोर आले होते. त्या वेळी वाहनतळ हटविण्याचा निर्णय अंतिम होऊनही दोन महिन्यांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
हेही वाचा – पुणे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, आमदार धंगेकर यांना डावलले
पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या वाहनतळाबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल. हा वाहनतळ कोणत्या उद्देशाने सुरू आहे, याबद्दलही विचारणा केली जाईल. सध्या तिथे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली वाहने लावली जात असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून उत्तर मिळाल्यानंतर यावर सविस्तरपणे बोलता येईल. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे