लोकसत्ता प्रतिनिधी,
पुणे: रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) असते. दलाकडून त्यासाठी जीवन रक्षक मोहीम राबवली जाते. या मोहिमेंतर्गत मे महिन्यामध्ये मध्य रेल्वेत १६ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले.
आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचवला आहे. कर्मचाऱ्यांकडून २४ तास सुरक्षेसाठी मोहीम राबवली जात आहे. मे महिन्यात मध्य रेल्वेमध्ये एकूण १६ प्रवाशांची जीव वाचवण्यात आला. त्यात नागपूर आणि भुसावळ प्रत्येकी सहा, मुंबई विभाग एक आणि सोलापूर विभागातील एका प्रवाशाचा समावेश आहे. पुणे विभागात अशा प्रकारची कोणताही घटना मे महिन्यात नोंदवण्यात आली नाही.
आणखी वाचा-देशातील ३१ कोटी जनतेला उच्च रक्तदाब, तर मधुमेहींची संख्या १० कोटी
अनेक वेळा निष्काळजीपणामुळे प्रवासी संकटात येतात. अशा प्रवाशांना प्रसंगावधान राखून वाचवण्याचे काम आरपीएफचे कर्मचारी करतात. गाडीत चढताना अथवा उतरताना प्रवासी खाली पडण्याच्याही अनेक घटना वारंवार घडतात. अशा वेळी वेळी आरपीएफचे कर्मचारी वेळीच धाव घेऊन प्रवाशांचा जीव वाचवतात. तसेच, लोहमार्गावर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारेही अनेक जण असतात. त्यांचेही प्राण वाचविण्याचे काम हे कर्मचारी करतात.