पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते.

या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या. त्या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या सर्व घडामोडी दरम्यान आज आरपीआय आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी आरपीआय गटाचे नेते परशुराम वाडेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणार्‍या राहुल सोलापूरकर यांना राज्य सरकार मार्फत पोलीस बंदोबस्त दिला जातो. ही बाब निषेधार्थ असून त्या विकृत व्यक्तिच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच राज्य सरकारने अशा विकृत व्यक्तीला पाठीशी घालू नये, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Story img Loader