पिंपरी : राज ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले ते ठिक आहे, मात्र ठाकरे यांना महायुतीत घेणे बरोबर नाही.  त्यांचा महायुतीला काही फायदा होत नाही. आताच आम्हाला सत्तेत हिस्सा मिळत नाही. ठाकरे आले तर काय मिळणार? असा सवाल करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास विरोध केला. तसेच महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढण्याची मागणीही त्यांनी केली.

चिंचवड, अजंठानगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गतच्या (एसआरए) तिसऱ्या टप्प्यातील इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आठवले यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, रिपाईंचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्या जात नाहीत. महाविकास आघाडीही एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता नाही. पण, महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसावे. महायुतीने लोकसभा, विधानसभेला रिपाईंला डावलले असले तरी मी त्यांना डावलणार नाही. रिपाईं पक्ष छोटा असला तरी गावागावात कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला डावलले जाणार नाही, अशी खात्री आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली आहे. संधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे’.

‘राज्यघटना बदलणार ही अफवा होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. विधानसभेला लाडकी बहिणीनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्याचाही फायदा महायुतीला झाला. दलित मतदार महायुतीच्या पाठीशी राहिला. अपेक्षेपेक्षा जास्त आमदार निवडून आले. मतदान यंत्रात दोष नाही. तर, महाविकास आघाडी दोषी आहे. ते हवेत राहिले आणि आम्ही जमिनीवर राहिलो. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. निकषात बसणा-या लाडक्या बहिणीना अपात्र केले जाणार नाही. त्यांना वेळेत पैसे दिले जातील. शासनाकडे पैसे कमी असल्याने आता कडक निकष टाकले आहेत. विकास कामासाठी निधी लागत आहे. महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’, असेही ते म्हणाले.

आठवले म्हणाले, ‘पुणे, मुंबई, ठाणे या मोठ्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गरिबांना पक्की घरे मिळत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सुरुवातीला १८० चौरस फूट जागेची घरे मिळत होती. त्यानंतर २४५ आणि आता ३०० चौरस फुटाची घरे मिळत आहेत. मात्र, आम्ही राज्य शासनाकडे कमीत ४५० चौरस फुटाची घरे असावीत, असा प्रस्ताव दिला आहे’.

सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी कारवाई व्हावी परभणीतील राज्यघटना विटंबना विरोधी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळायला उशीर होत आहे. जबाबदार पोलिसांवर तातडीने कारवाई होणे गरजेची आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.

Story img Loader