महायुतीच्या जागावाटपात पुणे लोकसभा आणि विधानसभेच्या कॅन्टोन्मेंट, पिंपरीसह काही जागा आपल्याला मिळाव्यात, अशी इच्छा रिपाइंने व्यक्त केल्याने व त्यासाठी ते आग्रही राहण्याचे स्पष्ट संकेत असल्याने आगामी काळात महायुतीत जागावाटपांवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना, भाजप, रिपाइंच्या महायुतीत पुणे लोकसभेची जागा भाजपकडे आहे. विधानसभेची कॅन्टोन्मेंटची जागा शिवसेनेकडे तर पिंपरीची भाजपकडे आहे. या जागा रिपाइंला हव्या आहेत. याशिवाय, लोकसभेच्या लातूर, रामटेक, दक्षिण मुंबई, कल्याणसह विधानसभेच्या ६१ जागांची निवड रिपाइंने केली असून त्यापैकी ३५ जागा मिळाव्यात, असे रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतेच पिंपरीत स्पष्ट केले होते. महायुतीत रिपाइंचे महत्त्व जाणून त्यानुसार जागावाटप व्हावे, आम्ही मागणी केलेल्या जागा सोडाव्यात. राखीव मतदारसंघांवर दलित उमेदवार असतील व खुल्या मतदारसंघांसाठी इतर समाजाला प्राधान्य असेल. भाजप-सेनेशी युती करून आम्ही क्रांतिकारक पाऊल उचलले. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दोन पावले पुढे यावे. पुण्यात खडकवासला मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला निवडून येण्याची रिपाइंची हक्काची मते मिळाली. त्याचपध्दतीने युतीची हक्काची मते रिपाइं उमेदवाराला मिळावीत, असे मुद्दे आठवले यांनी मांडले होते.
नियोजित जागावाटपात सर्वाधिक संघर्ष पिंपरी मतदारसंघावरून होऊ शकतो. खासदार गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अमर साबळे पिंपरी मतदारसंघातील भाजपचे नियोजित उमेदवार आहेत. त्यामुळे या जागेसाठी मुंडे प्रतिष्ठा लावतील, असे भाजप वर्तुळात मानले जाते. रिपाइंच्या पिंपरीतील एकमेव नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे पिंपरीतून लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली, तेव्हा १२ हजार मते मिळवली होती. महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यास त्या निवडून येतील, असा रिपाइंला विश्वास वाटतो. त्यामुळे पिंपरीचा आग्रह राहील, असे सांगण्यात येते.

Story img Loader