पुणे : भारतीय जनता पक्ष महायुतीमधील अन्य घटक पक्षांबरोबर जागांची वाटाघाटी करत आहे. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले- रिपाइं ) एकही जागा न देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा द्याव्यात, अशी आग्रही मागणी रिपाइंकडून करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रिपाइंची भूमिका शहराध्यक्ष संजय सोनावणे, उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी स्पष्ट केली. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, ॲड. मंदार जोशी, अशोक कांबळे, श्याम सदाफुले, महेंद्र कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: “…तर आम्ही त्याला ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही”, मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा इशारा
रिपाइंने मुंबईतील चेंबर, धारावी, अहमदनगरमधील श्रीरामपूर, उत्तर नागपूर, यवतमाळ मधील डमर-खेड, नांदेडमधील देगल्लूर, पुण्यातील पिंपरी-चिंचंवड आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाइंने मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम केले. त्यामुळे पुण्यातील वडगावशेरी किंवा पुणे कॅन्टोन्मेंटपैकी एक जागा सोडावी, अशी आग्रही मागणी आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत, रिपाइंचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानंतरच प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.