प्रभू राम व कृष्णापेक्षाही नरेंद्र मोदी कर्तृत्ववान आहेत आणि गुजरातचे विकास मॉडेलच या देशाला पुढे नेऊ शकेल, असा आभास विविध माध्यमांद्वारे निर्माण करून भाजपा आणि मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारार्थ लोणावळा येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पीपल्स रिपब्लिकन (कवाडे गट) पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मदन बाफना, जेष्ट नेते माउली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप ढमाले आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
या वेळी बोलताना आर.आर. म्हणाले, की गुजरातपेक्षा महाराष्ट्र हा विकासासंदर्भात सर्व क्षेत्रात अग्रेसर असून, आम्हाला महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात चालेल, पण जात व धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या मोदींचा गुजरात परवडणारा नाही. शिवसेना नेतृत्वावर टीका करताना पाटील म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत प्रगल्भ नेतृत्वाअभावी पक्षाची वाताहत झाल्याने अनेक शिलेदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहे.
या वेळी त्यांनी रामदास आठवले यांचाही आपल्या शैलीत समाचार घेतला. नामांतराच्या वेळी ज्या शिवसेनेने दलितांवरती अत्याचार केला  ते आठवलेंना कसे आठवले नाही. देशात जातीवाद निर्माण करणाऱ्या मोदी यांचा अश्वमेध हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्रच रोखेल, असेही ते म्हणाले.

Story img Loader