क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे शुक्रवारी केली. विस्तारासंदर्भातील आराखड्यांच्या विविध पर्यायांवर विचार करून योग्य पर्याय निश्चित करावा आणि स्मारक विस्तारासाठी जागा संपादन करून नागरिकांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे, अशी सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.
हेही वाचा >>> पिंपरीतील नाट्यसंमेलनासाठी ‘डीपीसी’तून २० लाखांचा निधी – अजित पवार यांची माहिती
राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासंदर्भात अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यावेळी उपस्थित होते. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य करण्याची सूचना पवार यांनी केली. अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले वाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल. यापूर्वीदेखील काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा यासाठी विरोध नाही. मात्र त्यांचे चांगल्या ठिकाणी पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पावणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.