प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अवघ्या साडेचार तासांमध्ये रोख आणि धनादेश या माध्यमातून सहा लाख रुपयांचा निधी रविवारी संकलित झाला.
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती ध्यानात घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे त्यांनी या कार्याला ‘नाम फाउंडेशन’ असे संस्थात्मक रूप दिले. या माध्यमातून निधी संकलनाच्या कामानेही गती घेतली असून अनेक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घातली जात आहे.
दुष्काळग्रस्त भागातील गावांच्या विकासासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्यांची भेट घेण्यासाठी फग्र्युसन रस्त्यावरील नाम फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये नाना पाटेकर सकाळपासून उपस्थित होते. हे औचित्य साधून अनेकांनी आपली मदत रोख अथवा धनादेशाच्या स्वरूपात खुद्द नानांच्या हाती सुपूर्द केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर पेन्शनर असोसिएशनच्या १६ सभासदांनी २ लाख ८१ हजार रुपयांचा, डॉक्टर मित्रांनी १ लाख ९५ हजार रुपयांचा धनादेश दिला. वडगावशेरी येथील पुण्यधाम युवा प्रतिष्ठानतर्फे ५१ हजार रुपये रोख मदत देण्यात आली. रविवारच्या सुटीचा योग साधून नाना पाटेकर यांची भेट घेत त्यांच्याकडे ५ लाख ४० हजार रुपये धनादेशाद्वारे तर रोख स्वरूपात ६० हजार रुपये सोपविण्यात आले. यातील एक हजार रुपयांची मदतही तितकीच मोलाची होती. प्रत्येकाशी नाना पाटेकर यांनी संवाद साधला. नाम फाउंडेशनला मदत करू इच्छिणाऱ्यांनी २५६५९२३८ किंवा ७७२२०७६१३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader