पुणे विद्यापीठामध्ये एका विषयाचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना तब्बल साडेसातशे रुपये मोजावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकारामध्ये उत्तरपत्रिकांची छायाप्रत उपलब्ध करून देण्याचा निर्णय २००९ पासून अमलात आला. मात्र, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देण्याबाबतच्या  नियमांमध्ये विद्यापीठाने नुकतेच बदल केले आहेत. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन अशा दोन्ही सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येत होत्या. मात्र, आता विद्यार्थ्यांनी आधी छायाप्रत घ्यायची आहे. त्यामध्ये काही शंका असल्यास त्यानंतर पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्रपणे अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी पुणे विद्यापीठामध्ये पाचशे रुपये, तर पुनर्मूल्यांकनासाठी साधारण अडीचशे रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे एका विषयाचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना छायाप्रतीचे पाचशे रुपये आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अडीचशे रुपये असे तब्बल साडेसातशे रुपये मोजावे लागणार आहेत.
माहिती आयुक्तांकडे तक्रार
पुणे विद्यापीठाने नियमांमध्ये केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांना मिळालेली छायाप्रत दुसऱ्या कुणालाही दाखवता येणार नाही,असाही नियम करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार तीन ऐवजी सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आता विद्यार्थ्यांना मिळू शकणार असल्या, तरी निकाल लागल्यापासून दहा दिवसांमध्येच छायाप्रत मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल, या नियमात विद्यापीठाने बदल केलेला नाही. हे नियम माहिती अधिकार कायद्याचा भंग करत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्तांकडे केली आहे.

Story img Loader