सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘शिवशक्ती संगम’ शिबिरात प्रतिपादन
हिंदू हीच आपल्या समाजाची ओळख आहे, आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या पूर्वजांचा गौरव ही आपली संस्कृती आहे. या समाजातील मतभेद दूर करण्यासाठी मनातूनच विषमता दूर करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. वैयक्तिक प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’ या पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या शिबिरामध्ये रविवारी ते बोलत होते. सरसंघचालकांनी उपस्थित स्वयंसेवक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, प्रांत संघचालक नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात या वेळी उपस्थित होते. पुण्याजवळील मारुंजी येथे साडेचारशे एकरच्या विस्तीर्ण जागेवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावरील राजदरबाराच्या रूपातील भव्य व्यासपीठ, गणवेशात उपस्थित सुमारे एक लाखांहून अधिक शिस्तबद्ध स्वयंसेवक, सर्वोत्तम नियोजन या वैशिष्टय़ांनी सजलेल्या या शिबिराला पन्नास हजारांहून अधिक नागरिकांसह राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.
भागवत म्हणाले, सरकार व नेते यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. केवळ तेच समाजाचे भले करू शकणार नाही. त्यांनी चांगले केलेले टिकायचे असेल तर समाज जागृत झाला पाहिजे. निर्बल समाजाला जगामध्ये किंमत नसते. ज्याची शक्ती असते त्याचेच ऐकले जाते. जसजशी देशाची शक्ती वाढते, तसतसे आपल्या देशाच्या सत्याची प्रतिष्ठाही वाढते. शक्ती म्हटल्यानंतर त्याच्या अर्थासंबंधीही आपल्याकडे निश्चित मान्यता आहे. शिवत्वाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिवत्वाला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे शिवशक्ती संगमाची समाजाला आज गरज आहे. हा कार्यक्रम वैभवाचे प्रदर्शन करणारा नाही. तर, देशाच्या उत्थानासाठी प्रामाणिकपणे नि:स्वार्थ बुद्धीने देश उभारणीसाठी योग्यता मिळविण्याचा संघ हा एकमेव मार्ग आहे. धर्म, प्रांत, जात यांचा विचार न करता संकटामध्ये धावून जाणारा स्वयंसेवक हे संघाच्या प्रयोगाचे फलित आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना मानणारा समाज उभा करण्यासाठी एकाच वेळी शिवत्व आणि शक्तीची आराधना करावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यासह भाजपचे शहरातील सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.
हिंदू हीच आपल्या समाजाची ओळख !
सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘शिवशक्ती संगम’ शिबिरात प्रतिपादन
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2016 at 02:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat says all religions teach us non violence and truth