लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली. या मुदतीत ३ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले असून, आता अर्ज प्रवेशासाठी सोडत काढण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ७ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध आहेत.
या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अर्ज भरू न शकलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच या पुढे पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत ३ लाख ३ हजार १३८ अर्ज दाखल झाले होते.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, ‘आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठीची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत साधारणपणे दरवर्षीइतकेच अर्ज आले आहेत. आता प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.