पुणे : शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. मात्र शिक्षण विभागाने अर्ज नोंदणीसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान नोंदणी प्रक्रियेत मंगळवारी सायंकाळपर्यंत जेमतेम ६० हजार अर्जच दाखल झाले होते.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यातील उपलब्ध शाळा नसल्यासच स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
हेही वाचा…पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हवाई दलाचा टेम्पो उलटला; मोठी वाहतूक कोंडी
प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर राज्यभरातून ७६ हजार ५३ शाळांमध्ये ८ लाख ८६ हजार ४११ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध झाल्या. त्यानंतर आरटीई प्रवेशांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली, तर अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. मात्र आरटीई प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा, विशेषत: इंग्रजी शाळा वगळण्यात आल्याने पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे ६० हजार अर्जच दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.