लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वायूवेग पथकाकडून बस स्थानकाबाहेरील २०० मीटर स्थानकाच्या परिसरात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्थानकांच्या बाहेरील खासगी प्रवासी बसचालक, रिक्षाचालक आणि इतर प्रवासी अशा २० वाहनचालकांवर कारवाई करून एक लाख ४८ हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगर आणि इतर आगारांच्या ठिकाणीही याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘आरटीओ’कडून स्पष्ट करण्यात आले.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बस स्थानकामध्ये आणि परिसरात खासगी बसचालक, रिक्षाचालकांचा बिनदिक्कत प्रवेश होत असून, सुरक्षिततेत अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, याबाबत स्वारगेट बस स्थानकाच्या आगारप्रमुखांनीदेखील याबाबत वेळोवेळी पोलीस आणि आरटीओ प्रशासनाला पत्र पाठवून कारवाई करण्याबाबत कळवले. याबाबत कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने वाहतूक पोलिसांच्या आणि आरटीओ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे ‘आरटीओ’कडून सोमवारपासून स्वारगेट बस स्थानकाच्या २०० मीटर हद्दीपर्यंतच्या परिसरात उभ्या असणाऱ्या खासगी प्रवासी बस आणि रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कारवाईमध्ये क्रमांक तीनच्या वायूवेग पथकाकडून बस स्थानकाबाहेर उभ्या असणाऱ्या खासगी प्रवासी बसच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच, ‘परमिट’ परवाना, वाहनचालक परवाना, गणवेश आणि इतर नियमांनुसार तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली असून, २० प्रवासी वाहनांमध्ये कागदपत्रापासून अनेक त्रुटी असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. वायूवेग पथकाकडून दंडात्मक कारवाई करून एक लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनधारकांना २०० मीटर हद्दीत येण्यास मज्जाव आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्वारगेट परिसरात वायूवेग (क्रमांक तीन) पथकाकडून २० वाहनांवर कारवाई करण्यात आली. इतर बस स्थानकांबाहेरही कारवाई करण्यासाठी वायूवेग पथकांना आदेश देण्यात आले आहेत. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>