पुणे : भरधाव वाहन चालविणाऱ्यांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतरही शहरात बेफाम वाहने चालिणाऱ्यांची संख्या वाढतच चालली असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या वर्षभरात ६६,६५३ वाहनांवर कारवाई केली असून, त्यामध्ये विनाहेल्मेट प्रवास करणारे सर्वाधिक १९,६४५ वाहनचालक आहेत. मात्र, त्या खालोखाल वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविणारे १३,८१७ वाहनचालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात अपघात रोखण्यासाठी प्रामुख्याने वेगमर्यादेवर नियंत्रण आणण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या नेमणुका, वाहतूक नियंत्रण दिव्यांची (सिग्नल) व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे, बचाव पथक, वेगनियंत्रक कॅमेरे (स्पीड गन), रम्बल स्ट्रिप, गतिरोधक आदी उपाययोजना केल्या आहेत.

‘आरटीओ’ने गेल्या वर्षभरात विनाहेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, मार्गिका बदल, परवानगी नसलेल्या ठिकाणी वाहन उभे करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, ट्रिपल सीट, आकर्षक वाहन क्रमाकांची पाटी वापरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणाऱ्या १९ हजार ६४५ वाहनचालकांचा समावेश आहे. सिंहगड रस्ता, वारजे, येरवडा, विश्रांतवाडी, वाघोली, हडपसर या परिसरात विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण जास्त आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १३ हजार ८१७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बेफाम वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

अशी आहे वेगमर्यादा

शहरातील आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावरून दुचाकी वाहनांसाठी प्रतितास ६० किलोमीटर, तर घाट अथवा वळणाच्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रतितास ४० किलोमीटर वेगर्मयादा आहे. चारचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी प्रतितास ५० किलोमीटर आणि घाट अथवा वळणाच्या रस्त्यावरून ४० किलोमीटर अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या मर्यादेचे शहरात उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून आले आहे.

आरटीओने वर्षभरात केलेली कारवाई

विनाहेल्मेट वाहन चालविणे – १९,६४५

अतिवेगाने वाहन चालविणे – १३,८१७

विम्याची मुदत संपलेली वाहने – ८,७४४

वाहनांचे दिवे बंद असणे – ५,७२९

आकर्षक वाहन क्रमांकाची पाटी – ३,५८०

मार्गिका बदल – २,३०४

वाहन चालविताना मोबाइलचा वापर – २,२४३

आसन पट्टा न वापरणे – ५,०८७

नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे – १,७७७

ट्रिपल सीट – १,४३५

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक – १,३९२

एकूण – ६६,६५३

वाहतूक नियमन कायद्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या कारवाईमध्ये अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. वायुवेग पथकाकडून ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे