रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये प्रतीक्षा कालावधीसाठी (वेटिंग) द्यायच्या भाडय़ाची गणना आपोआपच होत असल्याने त्यासाठी स्वतंत्र भाडे देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले आहे. ‘वेटिंग चार्ज’च्या नावाखाली प्रवाशांकडून अवाच्या सवा पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने त्या पाश्र्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सजग नागरिक मंचच्या वतीने विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार नोंदविली होती. ‘वेटिंग चार्ज’बाबतचे नियम तातडीने जाहीर करून रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली होती. वेटिंगसाठी रिक्षाच्या मीटरमध्ये व्यवस्था आहे. काही ठराविक वेळेनंतर रिक्षाच्या मीटरमध्ये वेटिंग दर्शविले जाते, मात्र त्याचा कोणताही आधार न घेता वेटिंगबाबत मनमानी आकारणी केली जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वेटिंगच्या या नियमाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तातडीने परिपत्रक काढून प्रवाशांच्या मनातील शंकांचे समाधान करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
आरटीओकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये वेटिंगसाठी स्वतंत्र भाडे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या रिक्षाचा पहिला टप्पा एक किलोमीटरवरून दीड किलोमीटर करण्यात आला आहे. त्यासाठी मीटरमधील यंत्रणा रिक्षाचालकांना बदलावी (कॅलिब्रेशन) लागणार आहे. संबंधित संस्थांकडून मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्यास ३० नोव्हेंबपर्यंतची मुदत आहे. तोवरच टेरीफ कार्डचा वापर करून रिक्षाचालकांना भाडेआकारणी करता येणार आहे. प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर मीटरमध्ये जुन्या दराने दर्शविलेले भाडे तपासून त्या भाडय़ासाठी टेरीफ कार्डवर सुधारित भाडेदराप्रमाणे दर्शविलेले भाडे द्यावे, असे आवाहनही आरटीओकडून करण्यात आले आहे.

Story img Loader