आरटीओमध्ये वाहनांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या विमा कंपनीच्या बनावट पॉलिसी काढून देणारे मोठे रॅकेट  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी या टोळीतील संगणक अभियंता आणि बेव डिझायनरला अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या विमा पॉलिसी बनवून देण्यासाठीचा ढाचा मिळाला असून त्यांनी आतापर्यंत दीडशे जणांना बनावट पॉलिसीची कागदपत्रे तयार करून दिल्याचे समोर आले आहे.
संतोष बाबुराव नलावडे (वय ३२) आणि फिरोज वझीर खान (वय ३९, दोघेही रा. गांधीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील नलावडे हा वेब डिझायनर असून खान हा संगणक अभियंता आहे. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर, सीपीयू, पेनड्राइव्ह, वेगवेगळ्या कंपनीच्या बनावट तयार केलेल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे आणि बनावट रबरी शिक्के असा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
पुणे शहरातील तीन व चार चाकी वाहनांची नोंदणी व हस्तांतरण करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या विमा कंपनीच्या बनावट पॉलिसी तयार करून दिल्या जात आहेत. एक बनावट पॉलिसी ही बाराशे रुपयांना विक्री करणारी व्यक्ती येरवडा परिसरात राहण्यास आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे कर्मचारी दीपक खरात यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडील असलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर बजाज अलाइन्स कंपनीची बनावट पॉलिसी असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर सोमवारी सायंकाळी खान याला अटक केली, असे भामरे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून हे बनावट पॉलिसी तयार करून देत आहेत. आरटीओतील एजंटामार्फत नागरिक यांच्याशी संपर्क साधत होते. त्यानुसार ग्राहकांना हवी असलेली पॉलिसीची बनावट कागदपत्रे तयार करून दिली जात. त्यासाठी तीनशे ते बाराशे रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. त्यांनी आतापर्यंत दीडशे जणांस बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे आढळून आले असून त्यांचा शोध सुरू आहे. नलावडे यास न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत, यामध्ये आरटीओ एजंटचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader