पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कामकाजात बदल केला आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था, आळंदी रस्ता कार्यालय व दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक येथील पक्का वाहन परवाना चाचणी आणि वाहन तपासणीच्या कामकाजात हा बदल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा १२ जूनला दुपारचा विसावा आरटीओच्या आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर आहे. त्यामुळे या मैदानावर नियमितपणे होणारे वाहन तपासणी व पक्क्या परवानाविषयक चाचणीचे कामकाज त्या दिवशी होणार नाही. नागरिकांनी १२ जूनची पूर्वनियोजित वेळ घेतलेली असल्यास वाहन तपासणी किंवा वाहन चालवण्याची चाचणी १७ जूनला होईल.

हेही वाचा… मुंबईत विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तुकाराम महाराजांची पालखी १२ जूनला जुना पुणे-मुंबई रस्ता- नाशिक फाटा या मार्गे पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. या दिवशी वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था येथे येण्या-जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी अर्जदारांना पोहोचण्यास गैरसोय होऊ शकते. पक्क्या वाहन परवान्याच्या चाचणीसाठी वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था येथे १२ जूनची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या उमेदवारांनी वाहन परवाना चाचणीसाठी १७ जूनला उपस्थित राहावे लागेल.

हेही वाचा… कारागृहात कैद्यांकडून होणारा मोबाइलचा वापर होणार कायमचा बंद, कारागृह प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १४ जूनला पुण्यातून सासवडला रवाना होणार आहे. या दिवशी हडपसर-सासवड मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी १४ जूनची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनांची दिवे (ता. पुरंदर) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तपासणी होऊ शकणार नाही. अशा वाहनधारकांनी त्यांची वाहने १४ जून पासून पुढील सात दिवासांमध्ये कोणत्याही दिवशी तपासणीसाठी दिवे येथे सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto has changed its operations on the occasion of sant dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi celebrations in pune print news stj 05 dvr